बसस्थानक बनले मद्यपी, रोडरोमीओंचा अड्डा

बसस्थानक बनले मद्यपी, रोडरोमीओंचा अड्डा

किरण भदे : सकाळ वृत्तसेवा
नसरापूर, ता.२५ : पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील नसरापूर-चेलाडी फाटा (ता. भोर) येथील एसटी महामंडळाच्या बसस्थानकाची वापराविना दुरवस्था झाली आहे. कचरा साचल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. भकास पडलेल्या स्थानकाची इमारत मद्यपी व रोडरोमिओंचा अड्डा बनली आहे. आदिवासी कातकरी वस्तीवरील मुले याचा गैरवापर करतात. इमारतीवरील पत्रा फुटला आहे. फरशा गायब झाल्या असून, तेथील दरवाजे पूर्णपणे तुटले आहे.

नसरापूर येथे महामार्गावर मोक्याच्या ठिकाणी १९९१ मध्ये महामंडळाने भोर आगाराच्या अंतर्गत बसस्थानक बांधले होते. तत्कालीन पशुसंवर्धन दुग्ध विकास मंत्री अनंतराव थोपटे व राज्य परिवहन महामंडळाचे संचालक शिवाजीराव ढमढेरे यांच्या हस्ते स्थानकाचे उद्‌घाटन झाले होते. यानंतर काही दिवस हे बसस्थानक सुरू होते. ते देखील फक्त भोर वेल्हे व पुणे या स्थानिक बसगाड्यांपुरतेच मर्यादित होते.
नसरापूर ग्रामपंचायतीने महामार्गा लगत गायरानाची जागा या बसस्थानकासाठी मोफत उपलब्ध करून दिली होती. या ठिकाणी बसस्थानकासाठी जागेचा वापर होत नसल्याने नसरापूर ग्रामपंचायतीने ही जागा एसटी महामंडळाकडुन परत मागितली आहे. मात्र परिवहन विभागाने त्यास नकार दिला आहे. ग्रामपंचायतीला अनेक प्रकल्पासाठी जागेची अवश्यकता असताना जागेचा वापर देखील केला जात नाही व परत देखील दिली जात नाही. या महामंडळाच्या भूमिकेवर नसरापूर ग्रामपंचायतसह स्थानिक नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

महामंडळाने केलेला प्रंचड खर्च पाण्यात
अनेक वेळा स्थानिक ग्रामस्थांनी या बसस्थानकात लांबपल्ल्याच्या गाड्या थांबवण्याची मागणी केली परंतु सातारा, सांगली, कोल्हापूरसह लांबपल्ल्याच्या गाड्या या स्थानकात कधीच आल्या नाहीत. त्या नंतर महामार्गाचे रुंदीकरण व नूतनीकरण सुरू झाले. तसेच चेलाडी येथे उड्डाणपुलाचे काम झाले. यामुळे बसस्थानकाचा होता तेवढा वापर देखील बंद झाला. यामुळे बसस्थानकासाठी महामंडळाने केलेला प्रंचड खर्च पाण्यात गेला आहे.

नसरापूर-चेलाडी येथील बस स्थानक महामार्गाला लागून असल्याने बहुतेक प्रवासी महामार्गावर थांबूनच मिळेल त्या वाहनाने प्रवास करतात. प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याने स्थानक बंद पडले आहे. पुन्हा डागडुजी व नूतनीकरण करून ते पुन्हा सुरू करण्याचा आमचा मानस आहे.
- सचिन शिंदे,विभागीय वाहतूक नियंत्रक, एसटी महामंडळ

बस स्‍थानक पुन्हा सुरू करण्याची मागणी
चेलाडी बस स्थानकात फक्त स्थानिक मार्गांवरील बस थांबत होत्या. त्यातीलही काही बस वळसा घेऊन बसस्थानकात येण्यास टाळाटाळ करत असत. त्यामुळे प्रवासी देखील महामार्गावर थांबत होते. येथील महामार्गावरून जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या व सर्व एसटी बस या ठिकाणी थांबल्या तर प्रवासी निश्चित बसस्थानकाचा वापर करतील. हे स्थानक पुन्हा सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

04124, 04125, 04126

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com