दिवळ्यातील कुटुंबाकडून आत्मदहनाचा इशारा

दिवळ्यातील कुटुंबाकडून आत्मदहनाचा इशारा

नसरापूर, ता. ५ : दिवळे (ता. भोर) येथील ग्रामपंचायतीच्या कारभाराच्या विरोधात येथील गणेश शिवाजी पांगारे यांनी १० जुलै रोजी भोर पंचायत समिती कार्यालयासमोर सहकुटुंब आत्मदहन करणार असल्याचा निवेदनाद्वारे इशारा दिला आहे.

याबाबत गणेश पांगारे यांनी भोर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, दिवळे येथे त्यांनी बांधलेल्या गोठ्याची नोंद घेण्यासाठी जाणीवपूर्वक अडचणी निर्माण केल्या जात आहेत. सातबारा उताऱ्यावरील सहहिस्सेदाराची परवानगी आणावयास सांगितली जात आहे. त्यामुळे या ठिकाणी त्यांना वीजजोड घेता येत नाही. मात्र, शासनाच्या नियम व अटी डावलून ग्रामपंचायत गावामधील दुसऱ्या व्यक्तीला घरकुल बांधण्याची परवानगी दिली आहे. तसेच, त्यांनी डिसेंबर २०२३ मध्ये अर्ज केला आहे, परंतु अद्यापपर्यंत त्यांना नळ कनेक्शन दिले नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना दररोज विहिरीवरून पाणी आणावे लागत आहे. तसेच, त्यांचे वडील शिवाजी हे किडनीच्या आजाराने त्रस्त असून, आई मणक्याच्या आजाराने त्रस्त आहे. अशा परिस्थितीत मानसिक तणावात सर्व कुटुंब असताना ग्रामपंचायतीकडून ठराविक व्यक्तींच्या सांगण्यावरून जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे. याबाबत कोठेही दाद दिली जात नसल्याने शेवटचा निर्णय म्हणून आम्ही येत्या दहा जुलै रोजी पंचायत समिती भोर कार्यालयासमोर सहकुटुंब आत्मदहन करणार आहे.’’
दरम्यान, गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे यांनी याबाबत तातडीने दखल घेतली असून, दिवळे ग्रामपंचायतीला गणेश पांगारे यांच्या मागण्यांसंदर्भात नियमानुसार योग्य ती कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

प्रशासनाने घेतली दखल
याबाबत ग्रामसेविका मोना सपकाळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, ग्रामपंचायत सदस्यांची तातडीने मीटिंग बोलावण्यात आली होती. त्यामध्ये गणेश पांगारे यांच्या गोठ्याची नोंद घेण्यात येणार आहे. जलजीवन योजनेचे काम पूर्ण झाल्यावर तातडीने त्यांना नळकनेक्शन देण्यात येणार आहे. त्यांनी माहिती मागितलेल्या घरकुलासंदर्भात पंचायत समितीमधून मार्गदर्शन घेण्यात येत आहे. त्यानुसार निर्णय घेण्यात येईल, अशी भूमिका ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी घेतली आहे. त्यांना आत्मदहनापासून परावृत्त होण्याची विनंती करणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com