शरद पवार, संजय राऊत
यांच्या भोर, मुळशीत सभा

शरद पवार, संजय राऊत यांच्या भोर, मुळशीत सभा

Published on

नसरापूर ता. १७ : भोर-वेल्हा-मुळशी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार, आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रचार सांगतेसाठी दोन मोठ्या सभा होत आहेत. भोर तालुक्यात होणाऱ्या पहिल्या सभेला ज्येष्ठ नेते शरद पवार, तर मुळशी तालुक्यात होणाऱ्या दुसऱ्या सभेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत उपस्थित राहणार आहेत.
महाविकास आघाडीची भोर मतदारसंघाची पहिली सांगता सभा सोमवारी (ता. १८) सकाळी साडेनऊ वाजता भोर तालुक्यातील कापुरव्होळ-हरिश्‍चंद्री येथील मैदानावर होत आहे. या सभेला ज्येष्ठ नेते शरद पवार उपस्थित राहणार आहेत. या सभेच्या माध्यमातून ते महाविकास आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांना विजयी करण्याचे आवाहन करणार आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भोर तालुकाध्यक्ष रवींद्र बांदल, मुळशीचे महादेव कोंढरे, वेल्ह्याचे संतोष रेणुसे यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचार शुभारंभाची सभा शरद पवार यांच्या उपस्थितीत कापुरव्होळ-हरिश्‍चंद्री मैदानावर झाली होती. त्यावेळी खासदार सुळे यांच्या मागे ठाम राहिलेल्या आमदार संग्राम थोपटे यांना शरद पवार यांनी भाषणातून पुढील काळात तालुका, जिल्हा, राज्य पातळीवर मी स्वतः संग्राम यांच्या मागे ठाम उभा राहणार असल्याची ग्वाही दिली होती. या घोषणेचे उपस्थितांनी जोरदार स्वागत केले होते. त्या पार्श्वभूमीवर त्याच मैदानावर संग्राम थोपटे यांच्या प्रचारार्थ होत असलेल्या सभेत शरद पवार काय बोलतात? याकडे मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.
थोपटे यांच्या प्रचार सांगतेच्या दुसऱ्या सभेला खासदार संजय राऊत उपस्थित राहणार आहेत. त्यांनीदेखील लोकसभा निवडणुकीत खासदार सुळे यांच्या प्रचारावेळी संग्राम थोपटे विधानसभा अध्यक्ष झाले असते, तर महायुती सरकार आलेच नसते, असे सांगून थोपटेंना बळ दिले होते. आता थोपटेंच्या विधानसभेच्या प्रचारासाठी संजय राऊत यांची ही सभा मुळशी तालुक्यातील सुंदरबन मंगल कार्यालय कासार आंबोली येथे सोमवारी (ता. १८) दुपारी तीन वाजता होत आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येण्यासाठी आमदार संग्राम थोपटे यांना मतदानाचे आवाहन खासदार राऊत करतील, तसेच आमदार थोपटे यांच्या प्रचारात सक्रिय असलेल्या शिवसैनिकांना यामुळे मोठे बळ मिळणार आहे, अशी माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भोर तालुकाप्रमुख ज्ञानेश्‍वर शिंदे, राजगडचे दीपक दामगुडे, मुळशीचे सचिन खैरे यांनी दिली.
या दोन्ही सभांना मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार असून, या सभांमध्येच आमदार संग्राम थोपटे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब होईल, असा विश्‍वास काँग्रेसचे भोर तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे, वेल्हे तालुकाध्यक्ष नाना राऊत व मुळशी तालुकाध्यक्ष गंगाराम मातेरे यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com