भांडणाच्या रागातून बाप-लेकास मारहाण

भांडणाच्या रागातून बाप-लेकास मारहाण

Published on

खेड शिवापूर, ता. १४ : कोंढणपूर फाट्यावर (ता. हवेली) दुकानासमोर गाडी लावण्यावरून झालेल्या भांडणात सात जणांनी बाप-लेकास मारहाण केल्याची घटना घडली आहे. यामध्ये मुलगा गंभीर जखमी झाला असून, तो पुणे येथील रुग्णालयात उपचार घेत आहे.
याबाबत आदिनाथ शंकर वाडकर (वय ४९, रा. कोंढणपूर फाटा, ता. हवेली) यांनी राजगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अर्जुन प्रमोद रजपूत, रोहन रजपूत, तेजस रजपूत, करण रजपूत (सर्व रा. शिवापूर, ता. हवेली) व त्यांचे इतर अनोळखी तीन साथीदार अशा सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वाडकर व मुख्य आरोपी अर्जुन रजपूत यांची गुरुवारी (ता. १०) कोंढणपूर फाट्यावर दुकानासमोर गाडी लावण्यावरून भांडण झाले होते. या वेळी अर्जुन रजपूत यास मारहाण झाली होती. याचा राग मनात धरून अर्जुन रजपूत याने सहा साथीदारांसह शुक्रवारी (ता. ११) वाडकर यांच्या कोंढणपूर फाटा येथील घरात घुसून आदिनाथ व त्यांचा मुलगा लोकेश यांना शिवीगाळ दमदाटी करत मारहाण केली. या घटनेत गंभीर जखमी झाल्याने लोकेश यांना पुणे येथील रुग्णालयात दाखल केले आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अर्जुन रजपूत, तेजस रजपूत व करण रजपूत यांना अटक केली असून, न्यायालयाने तिघांनाही चार दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक वृषाली देसाई करत आहेत.

Marathi News Esakal
www.esakal.com