दिडघर येथे सिलिंडरच्या स्फोटामुळे दोन घरे भस्मसात

दिडघर येथे सिलिंडरच्या स्फोटामुळे दोन घरे भस्मसात

Published on

नसरापूर, ता. २ ः दिडघर (ता. भोर) येथे मंगळवारी (ता. २) घरामधील गॅस सिलेंडरची गळती होऊन मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे लागलेल्या आगीत दोन घरे भस्मसात झाली आहेत. यामध्ये दोन्ही घरामधील साहित्यासह सुमारे १० लाखांचे नुकसान झाले आहे. महसूल विभागाकडून पंचनामा करण्यात आला आहे.
येथील यमुना रघुनाथ बांदल व दिनेश काशिनाथ बांदल यांची एकाच वाड्यात शेजारी असलेल्या दोन घरांचे मोठे नुकसान झाले आहे. ग्रामस्थांसह दोन अग्निशामक दलाच्या गाड्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, लाकडी तुळई व कौलारू असलेली ही घरे पूर्ण जळून गेली.
याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास एका घरातील गॅस सिलेंडरचा अचानक स्फोट झाल्याचा आवाज आला व घराचे छप्पर जळू लागल्याचे परिसरातील नागरिकांच्या लक्षात आले. यावेळी एका घरातील यमुनाबाई या शेतात गेल्या होत्या, तर दिनेश बांदल हे त्यांच्या नवीन बांधलेल्या घरामध्ये होते. त्यांना तातडीने बोलावून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.
यावेळी येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन बांदल यांनी पीएमआरडीएच्या अग्निशमन केंद्रास, तसेच भोर नगरपालिकेच्या अग्निशमन केंद्रास फोन करून माहिती दिली. काही वेळाने पीएमआरडीएच्या अग्निशमन केंद्राच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहचल्या. त्यांच्या साहाय्याने ग्रामस्थांनी सुमारे तीन तासांनी आग आटोक्यात आणली. मात्र, आगीची धग जास्त असल्याने घरातील साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले आहे.
आगीमध्ये घरातील गहू, तांदळाचे कट्टे, कडधान्य, घर प्रपंचातील इतर सर्व साहित्य, घराचे छप्पर, सागवान लाकूड, कपडे, रोकड व साडेपाच तोळे सोने, असे मिळून जवळपास सुमारे १० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
घटनास्थळी नसरापूरचे महसूल मंडलाधिकारी प्रदीप जावळे, ग्राममहसूल अधिकारी सचिन ढोरे, ग्रामपंचायत अधिकारी सरला नलावडे यांनी भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. महसूल अधिकारी ढोरे यांनी झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला. यावेळी पोलिस पाटील नीता सोंडकर व ग्रामस्थ उपस्थित होते.

नसरापूरला अग्निशामन केंद्राची गरज
सिलेंडरचा स्फोट एवढा मोठा होता की सिलिंडर टाकीचे अक्षरशः दोन तुकडे होऊन लांब जाऊन पडले. नसरापूर व परिसरासाठी नसरापूर महामार्गालगत अग्निशमन केंद्राची गरज पुन्हा एकदा तीव्रतेने जाणवली. पुणे किंवा भोर इथून बोलावलेल्या अग्निशामक गाड्या पोहोचण्यासाठी एक ते दीड तास लागतो. तोपर्यंत आग मोठ्या प्रमाणात फैलावते. यासाठी मध्यवर्ती नसरापूर येथे अग्निशामन केंद्र होणे गरजेचे आहे.

06024

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com