पुस्तक महोत्सवात भेलके महाविद्यालयाचा सहभाग
नसरापूर, ता. १० : भारत सरकारच्या नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया तर्फे पुणे येथे पुणे पुस्तक महोत्सवाचे आयोजन केले आहे. या उपक्रमात सहभागी होण्याचे विविध महाविद्यालयांना आवाहन केले होते. यात नसरापूर (ता. भोर) येथील शंकरराव भेलके महाविद्यालयाने उत्स्फूर्त सहभाग घेतला.
महाविद्यालयातील ग्रंथालयामध्ये मंगळवारी (ता. ९) सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत हा उपक्रम पार पडला. उपक्रमात महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या आवडीचे पुस्तक वाचन केले. वाचनाच्या साहित्यामध्ये कथा, कादंबऱ्या, चरित्रे, स्पर्धा परीक्षा व इतर अवांतर साहित्य उपलब्ध होते. उपक्रमाचे आयोजन ग्रंथपाल प्रा.भगवान गावित, एन.एस.एस. अधिकारी प्रा.दयानंद जाधवर, सुमीत कांबळे यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.तुषार शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

