नसरापूर- वेळू गटात चौरंगी लढतीची शक्यता
किरण भदे : सकाळ वृत्तसेवा
नसरापूर, ता. १७ : भोर तालुक्यातील नसरापूर- वेळू जिल्हा परिषद गटातील तीन गावे वगळून शेजारील गटातील तीन गावे समाविष्ट केली आहेत. त्यामुळे या गटात शिवसेना (शिंदे), शिवसेना (ठाकरे), भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये चौरंगी लढत होणार असल्याचे दिसत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने त्यांचे या गटातील उमेदवार निश्चित केले असून, इतर पक्षांच्या नेत्यांची अद्याप इच्छुकांशी चर्चाच चालु आहे.
नसरापूर- वेळू गटातून कामथडी, उंबरे व करंदी ही तीन गावे वगळून ती जुन्या संगमनेर- भोंगवली गटात जोडून त्या गटाचे कामथडी-भोंगवली गट असे नवे नामकरण झाले. त्या गटातील हातवे बुद्रुक, हातवे खुर्द व तांभाड ही गावे नव्याने नसरापूर- वेळु गटात जोडली गेली. त्यामुळे बरेच आरोप प्रत्यारोप व राजकीय चर्चा घडल्या. या निर्णयाला आव्हान देत बदलण्याचा देखिल प्रयत्न झाला, परंतु बदलले गेले नाही. त्या दोन्ही गटातील प्रस्थापित नेत्यांनी गट न बदलता समोर आलेल्या परिस्थितीतच लढण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे या दोन्ही गटातील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नसरापूर- वेळू गटात एकूण ३१ गावे असून, एकूण मतदान ३६ हजार ८३४ आहे. त्यामध्ये १८ हजार ५३१ पुरुष मतदार व १८ हजार ३०३ महिला मतदार आहेत. तालुक्यातील शिंदेवाडी ते नसरापूर या महामार्ग पट्ट्यातील गावांचा व नसरापूरपासून वेल्हे रस्त्यावरील पारवडी, सोनवडीपर्यंत गावांचा समावेश आहे. या गटातील शिंदेवाडी (मतदान १९९०), वेळू (३१८५), वरवे खुर्द (१७४५), कांजळे(११३५), केळवडे (२५६५), नसरापूर (३०४५), कुरंगवडी (१३७४), हातवे बुद्रुक (१७७५), तांभाड (१३५४) ही मोठी गावे निकालावर परिणाम करणारी आहेत. अनेक इच्छुक या गावांमधून आहेत.
नसरापूर- वेळू गटात यावेळी नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) आरक्षण आहे. बहुतेक सर्व पक्षाच्या राजकीय नेत्यांनी कुणबी प्रमाणपत्र घेऊन लढण्याची तयारी केली आहे, तर पंचायत समितीच्या वेळू व नसरापूर या दोन्ही गणात सर्वसाधारण खुले आरक्षण आहे. पंचायत समिती गणासाठी देखील अनेकजण इच्छुक आहेत. नसरापूर गणासाठी राष्ट्रवादीकडून, तर वेळू गणासाठी शिवसेना ठाकरे पक्षाकडून उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे. गट व गणातील इच्छुकांमधून उमेदवार निवडताना नेत्यांची तारांबळ होणार आहे. उमेदवारी न मिळालेले इच्छुक ऐनवेळी पक्षांतर करण्याची शक्यता आहे.
वेळू गणात शिंदेवाडी, ससेवाडी, वेळू, कासुर्डी खे.बा., रांझे, कुसगाव, खोपी, शिवरे, वरवे खुर्द, वरवे बुद्रुक, कांबरे खे.बा., कांजळे-अशी एकूण १२ गावे असून, एकूण मतदान १७ हजार ८७८ आहे. नसरापूर गणात साळवडे, केळवडे, नायगाव, देगाव, नसरापूर, माळेगाव, निधान सांगवी, खडकी, केतकावणे, हातवे खुर्द, हातवे बुद्रुक, तांभाड, सांगवी खुर्द, विरवाडी, जांभळी, कोळवडी, कुरंगवडी, सोनवडी, पारवडी, अशी १९ गावे असून, एकूण मतदान १८ हजार ९५६ आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

