
चिंचणीच्या सरपंचांवरील अविश्वास ठराव मंजूर
न्हावरे, ता. ३ : शिरूर तालुक्यातील चिंचणी येथील सरपंच सुरेखा बाळासाहेब पवार यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर झाल्याची माहिती ग्रामसेवक लहू जगदाळे यांनी दिली.
दोन वर्षांपूर्वी ९ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक झाली होती. त्यानंतर सुरेखा बाळासाहेब पवार यांना सर्वानुमते सरपंच करण्यात आले होते. दरम्यानच्या काळात एका सदस्यांचे निधन झाले आहे. मात्र, सरपंच पवार या कारभार करताना कोणालाही विश्वासात घेत नाहीत, मनमानी कारभार करतात, असा आक्षेप घेऊन आठपैकी सहा सदस्यांनी त्यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केला होता.
तहसीलदार बालाजी सोमवंशी यांच्या अध्यक्षतेखाली अविश्वास ठरावावर मतदान झाले. त्यामध्ये ६ मतांनी अविश्वास ठराव मंजूर झाला. अविश्वास ठरावाच्या बाजूने उपसरपंच अनिल सुभेदार पवार, परिघा गोरख पवार, आनंदा बारकू शेलार, उज्ज्वला अनिल पवार, सागर चंद्रकांत कट्टे, वंदना बापूराव पवार यांनी मतदान केले. या वेळी सरपंच पवार या सभागृहात गैरहजर राहिल्या. त्यांच्याशी संपर्क करण्यात आला, पण तो होऊ शकला नाही.