मंचर वनपरिक्षेत्रात बिबट्यांसाठी ५१ पिंजरे

मंचर वनपरिक्षेत्रात बिबट्यांसाठी ५१ पिंजरे

Published on

निरगुडसर, ता. १० : आंबेगाव तालुक्यातील मंचर वनपरिक्षेत्रात असलेल्या चार परिमंडळातील एकूण ५५ गावांपैकी ३० गावांत ५१ पिंजरे बिबट्यांना पकडण्यासाठी वनविभागाने सज्ज ठेवले आहेत. त्यातील २५ पिंजरे बिबट्यांचे हॉटस्पॉट झालेल्या निरगुडसर, गावडेवाडी, अवसरी बुद्रुक, अवसरी खुर्द, मंचर, वडगाव काशिंबेग, खडकी, पिंपळगाव या आठ गावांत बसविले आहेत.
जुन्नर वनविभागातील मंचर वनपरिक्षेत्रात असलेला ऊसपट्टा बिबट्यांचे आश्रयस्थान ठरला आहे. तसेच, या गावांजवळून घोड आणि मीना नदीचे पात्र आहे. त्यातून या गावांचा परिसर हिरवागार असतो. त्यामुळे या परिसरात बिबट्यांना पिण्यासाठी पाणी आणि सावज सहज मिळते.
त्यामुळे या परिसरात बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. या वनपरिक्षेत्रात ५५ गावे येतात. ती कळंब, वळती, धामणी आणि मंचर या चार वन परिमंडळात विभागलेली आहेत. येथील बिबट्यांवर नियंत्रण आणण्यासाठी वनविभागाची यंत्रणा प्रयत्न करत आहे.

वनपरिमंडळनिहाय गावांची संख्या व कंसात पिंजरे
कळंब : १३ (८)
वळती : १४ (१९)
धामणी : ६ (७)
मंचर : १८ (१७)

वनपरिमंडळनिहाय उपाययोजना
- कळंब
या वनपरिमंडळातील पाच गावांत आठ पिंजरे वनविभागाने लावले आहेत. यातील खडकी आणि पिंपळगाव ही दोन गावे बिबट्यांसाठी हॉटस्पॉट आहेत. वनपरिमंडळातील ५० कुटुंबांना ७५ टक्के अनुदानावर सौर कुंपण योजना (झटका मशीन) राबवण्यात आली आहे. खडकी व पिंपळगाव या ठिकाणी प्रत्येकी एक, अशी एकूण दोन एआय मशीन बसवण्यात आल्या आहेत.

- वळती
या वनपरिमंडळात एकूण १४ गावे येतात. यातील १० गावांत १९ पिंजरे लावण्यात आले आहेत. त्यातील निरगुडसर, मेंगडेवाडी, गावडेवाडी, अवसरी बुद्रुक, शिंगवे, वळती रांजणी ही बिबट्यांची हॉटस्पॉट गावे आहेत. या वनपरिमंडळात अद्याप एकाही ठिकाणी सौर कुंपण योजना व एआय मशीन बसवण्यात आलेली नाही. निरगुडसर बीटमध्ये सौर कुंपण योजनेसाठी लाभार्थ्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे.

- धामणी
या वनपरिमंडळात असलेल्या १० गावांपैकी ६ गावांत ७ पिंजरे लावण्यात आले आहेत. या वनपरिमंडळात सौर कुंपण योजनेसाठी काही गावात लाभार्थ्यांच्या यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. एआय मशीन लाखणगाव बीटमध्ये सात ठिकाणी बसवण्यात आल्या आहेत, तर धामणी मंडळात काही ठिकाणी बसवण्यात आल्या आहेत.

- मंचर
या वनपरिमंडळात १८ गावे असून, वनविभागाने १७ पिंजरे लावले आहेत. यातील हॉटस्पॉट गावे असलेल्या मंचर परिसरात ५, अवसरी खुर्द येथे ४ आणि वडगाव काशिंबेग येथे ३, असे एकूण १२ पिंजरे लावण्यात आले आहेत. या वनपरिमंडळात नारोडी येथे ७ आणि लांडेवाडी येथे १०, अशा एकूण १७ कुटुंबांना सौर कुंपण योजना देण्यात आली आहे. अवसरी खुर्द याठिकाणी दोन एआय मशीन बसवण्यात आल्या आहेत.

मंचर वनपरिक्षेत्रात एकूण ५५ गावे येतात, यामध्ये बिबट्यांची संख्या मोठी आहे. त्यातील अनेक गावे बिबट्यांची हॉटस्पॉट झाली आहेत. या अगोदर ५५ गावांसाठी अवघे २० पिंजरे होते. त्यामुळे पिंजरे लावण्यात अडचणी येत होत्या, परंतु आता सरकारकडून नव्याने ३६ पिंजरे उपलब्ध झाले आहेत. आता पिंजरे लावण्यात कोणतीही अडचण येत नाही. मागेल त्या ठिकाणी पिंजरे लावून बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी योग्य ती कारवाई केली जाईल.
- विकास भोसले, वनपरिक्षेत्र अधिकारी, मंचर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com