आदर्शगाव भागडी शाळेत प्लास्टिकमुक्त ‘आनंदी बाजार’

आदर्शगाव भागडी शाळेत प्लास्टिकमुक्त ‘आनंदी बाजार’

Published on

निरगुडसर, ता. २४ : भागडी (ता. आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांमध्ये व्यवहारज्ञान, पर्यावरण जाणीव व सामाजिक कौशल्यांचा विकास व्हावा या उद्देशाने आनंदी बाजार, खाद्य यात्रा घेण्यात आली. हा उपक्रम पूर्णतः प्लास्टिकमुक्त पद्धतीने राबविण्यात आला.
भागडी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये शनिवारी (ता. २०) उपक्रमाची सुरुवात प्रभात फेरीने करण्यात आली. सहावी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांनी प्लास्टिक वापराचे दुष्परिणाम पथनाट्यातून प्रभावीपणे सादर करत ग्रामस्थांमध्ये जनजागृती केली. यावेळी पालक, ग्रामस्थांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळून कापडी पिशव्यांतूनच खरेदी केली.
ईसीए उपक्रमांतर्गत पर्यावरण संवर्धन संस्था यांच्या माध्यमातून विनिता दाते यांनी बाजारासाठी आवश्यक असलेल्या सर्व कापडी पिशव्या उपलब्ध करून दिल्या. या आनंदी बाजाराचे वैशिष्ट्य म्हणजे तीन पिढ्यांचा सहभाग. विद्यार्थ्यांसोबत कुटुंबीयांमधील स्नेह, सहकार्य आणि एकजुटीचे सुंदर चित्र यावेळी पाहायला मिळाले. इयत्ता पहिलीपासून सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी भाज्या, फळभाज्या, कडधान्ये, फळे, चहा, मिसळ, वडापाव, इडली, पाणीपुरी, मेदूवडा, खिचडी, गुलाबजाम आदी खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते.
बाजारात सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, ज्येष्ठ नागरिक, पालक आणि ग्रामस्थांनी सहभाग घेतला. या उपक्रमातून ३५ हजार रुपयांची उलाढाल झाली. ग्रामस्थांनी खरेदी आणि खाद्यपदार्थांचा मनमुराद आनंद घेतला. पालक वर्गाने या उपक्रमाचे मनापासून कौतुक करत असे उपक्रम वारंवार राबवावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. या पर्यावरणपूरक उपक्रमाबद्दल केंद्रप्रमुख राजू जाधव, विस्तार अधिकारी शैला निमसे-टाकळकर, गटशिक्षणाधिकारी रूपाली धोका (पंचायत समिती आंबेगाव) यांनी भागडी शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Marathi News Esakal
www.esakal.com