मंचर- रांजणी रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास सुरुवात
निरगुडसर, ता. १९ ः मंचर ते रांजणी (ता. आंबेगाव) रस्त्यावर खड्डेच खड्डे या आशयाचे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने खड्डे बुजविण्यास सुरुवात केली आहे. यामुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
आंबेगाव तालुक्यातील मंचर- रांजणी रस्त्यावरील पिंपळगाव फाटा ते रांजणी दरम्यान मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. याबाबत ‘सकाळ’ने शुक्रवारी (ता. १६) छायाचित्रासह वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने खडी व डांबर याच्या साहाय्याने खड्डे बुजविण्यास सुरुवात केली आहे. तसेच, रोलर फिरवून देखील मजबुतीचे काम केले जात आहे. चांडोली बुद्रुक फाटा ते खडकी या दरम्यान मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. हे खड्डे बुजविण्यात आले असून, खडकी फाटा ते थोरांदळे, रांजणी खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर चांडोली बुद्रुक फाटा ते मंचर (पिंपळगाव फाटा) यादरम्यानचे खड्डे बुजवून प्रवाशांचा मार्ग सुकर केला जाणार आहे. खड्डे बुजविण्यास सुरुवात केल्याने प्रवाशांनी ‘सकाळ’चे आभार व्यक्त केले.
03111

