
उजनीतून सोलापूर शहरासाठी विसर्ग
नीरा नरसिंहपूर, ता. २७ : उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी भीमा नदीत सहा हजार क्युसेकने पाणी सोडले आहे. हे पाणी ५ एप्रिलपर्यंत सुरू राहील, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. दरम्यान, या पाण्यामुळे भीमा नदीवर असलेले कोल्हापूर पद्धतीचे १७ बंधारे भरणार आहेत.
धरणातील पाणी साठ्यामुळे उन्हाळ्यात शेती, पिण्यासाठी व इतर सर्व उद्योगासाठी पाणी कमी पडणार नाही, असे नियोजन जलसंपदा विभागाने केलेले आहे. सोलापूर शहराला टाकळी बंधाऱ्यातून पाणीपुरवठा करण्यासाठी सध्या नवीन दोन मोठे पंप बसविले आहेत. त्यामुळे टाकळी बंधाऱ्यातील पाणी मार्चअखेरपर्यंत पुरेल अशी वस्तुस्थिती आहे. सोलापूर महानगरपालिकेने टाकळी बंधाऱ्यात मार्चअखेरपर्यंत पाणी पोहोचले पाहिजे, असे जलसंपदा विभागाला कळवले आहे.
नियोजनानुसार उजनीतून वीजनिर्मिती केंद्रासाठी १६०० क्यूसेक पाणी सोडले जात आहे. तर नदीपात्रात ६ हजार क्युसेकचा विसर्ग सोडला जात आहे. सदरचे पाणी नऊ ते दहा दिवस नदीत प्रवाहित राहणार आहे. सदरचे पाणी मार्चअखेरपर्यंत टाकळी बंधाऱ्यात पोहोचेल टाकळी व चिंचपूर बंधारे पूर्ण क्षमतेने भरून पुरेसा पाणीसाठा होईल.
दरम्यान, या पाण्यामुळे पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला आदी शहरांना व भीमा नदीकाठावरील माढा व इंदापूर तालुक्यातील गावे व वाड्या वस्त्यांवरील नागरिक व पशुधनाला उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे. त्याचप्रमाणे भीमा नदीवर असलेले कोल्हापूर पध्दतीचे १७ बंधारे पाण्यामुळे भरणार आहेत.
03230