बावडा- गणेशवाडीची ग्रामसभा गोंधळामुळे गुंडळली
नीरा नरसिंहपूर, ता. १ : बावडा (ता. इंदापूर) येथील गणेशवाडी येथे ग्रामसभा जलजीवन मिशनअंतर्गत झालेल्या दर्जाहीन कामाची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकाच्या जागेच्या वादावरून गोंधळ झाल्याने पदाधिकाऱ्यांनी पाय काढल्याने इतर विषयांवर चर्चा न होताच एक तासाच्या गोंधळानंतर गुंडाळण्यात आली. सुरुवातीस शासनाच्या वैयक्तिक व सार्वजनिक लाभाच्या योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना शिफारस देण्याचा ठराव ग्रामसभेत ग्रामस्थांनी एकमताने मंजूर केला.
बावडा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गणेशवाडी (प्रभाग एक) येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त ग्रामसभेचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी सरपंच पल्लवी गिरमे होत्या. यावेळी महादेव घाडगे, संतोष सुर्यवंशी, विठ्ठल घोगरे, दीपक घोगरे, राजेंद्र व्होनमाने, सुधाकर कांबळे, तानाजी गायकवाड, नामदेव घोगरे, तुकाराम घोगरे, किरण खंडागळे, मुनीर अत्तार, अश्वजित कांबळे, विशाल कांबळे, धनाजी शेंडगे, गणेश घोगरे, सागर खंडागळे, अश्विनी साठे, अविनाश खंडागळे, महावीर साठे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामसभेच्या ठरावाचे वाचन ग्रामपंचायत अधिकारी अंबिका पावसे यांनी केले. ज्या लाभार्थ्यांना कृषी, रोहयो, समाजकल्याण, ग्रामविकास, महसूल विभागाच्या योजनांचा लाभ घ्यायचा आहे, त्यासाठी महा ई सेवा केंद्रावरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागेल. त्यासाठी ग्रामसभेचा ठराव सर्वांना देण्याचा ठराव मंजूर केला. तर रमाई आवास योजना, अहिल्याबाई होळकर आवास योजना, दिव्यांग आवास योजना, यशवंत घरकुल अशा विविध योजनांची माहिती देण्यात आली. तसेच सभेत आलेल्या काही अर्जाचे वाचन केले. त्यामध्ये संतोष खंडागळे यांनी गणेशवाडी येथील जलजीवन योजनेचे काम दर्जाहीन झाले असून, त्याची सखोल चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी अर्जाद्वारे जिल्हाधिकारी व ग्रामसभेला केली. ग्रामसभेने सदर अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे पुढील कारवाईकरिता पाठवण्याचा ठराव मंजूर केला.
सभेच्या अजेंड्यावरील बाकी काही विषय शिल्लक असताना गणेशवाडी येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकासाठी दिलेल्या जागेसंदर्भातील विषयावर चर्चा सुरू होताच प्रचंड वादावादी झाली. त्यातून मार्ग काढण्यासाठी अनेकांनी प्रयत्न करूनही त्यास यश आले नाही. याविषयावर वादावादी वाढतच चालल्याने सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, सदस्यांनी सभेतून काढता पाय घेतला. सभेतील अनेक विषय व अर्जाचे वाचन शिल्लक ठेवून ग्रामसभा गुंडाळण्यात आली.
गणेशवाडी येथील प्रलंबित स्मशानभूमी, पिण्याची पाणी योजना, शौचालय, अंतर्गत गटार योजना, सांडपाण्याचा निचरा, अंगणवाडी इमारत, गावातील भेडसावणारे इतर विषयांवर ग्रामस्थांनी चर्चेची मागणी करूनही चर्चा करण्यातच आली नाही. उलट गणेशवाडी ग्रामस्थांना सर्व सोईपासून पुन्हा एकदा वंचित ठेवण्याचे काम करण्यात आल्याचा राग ग्रामस्थांनी माध्यमांसमोर बोलून दाखवला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.