भीमा, नीरा नदीवरील बंधाऱ्यांना ढापे टाका
नीरा नरसिंहपूर, ता. १० ः परतीच्या पावसाने अखेर काढता पाय घेतला असून, भीमा नदीतील उजनीचे पाणी कमी करण्यात आले आहे. नीरा नदीचेही पाणी वाहण्याचे मंदावले आहे. त्यामुळे भीमा नदीवरील तीन व नीरा नदीवरील दहापेक्षा अधिक बंधाऱ्यांचे ढापे टाकून पाणी अडवण्यात यावे, अशी मागणी शेतकरी व नागरिकांनी जलसंपदा विभागाकडे केली आहे. अन्यथा वर्षभर पिकांना पाण्याविना जगवण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे.
भीमा नदीवरील भाटनिमगाव, टणू, नरसिंहपूर, तर नीरा नदीवरील संगम, गिरवी, ओझरे, लुमेवाडी, अकलाई, सराटी, नीर निमगाव, भगतवाडी, निरवांगी, खोरोची आदींसह बंधाऱ्यांना ढापे टाकण्यात आली नसल्यामुळे पाणी वाहून चालले आहे. जलसंपदा विभागाच्या शासकीय नियमानुसार प्रतिवर्षी पावसाळ्याच्या अखेरीस १८ ऑक्टोबर दरम्यान नदीवरील सर्व बंधाऱ्यांना ढापे टाकून पाणी अडवण्याचा नियम आहे. मात्र, ऑक्टोबर महिन्यातील पंधरवडा संपत आला असतानाही अद्याप ढापे टाकण्यात आलेली नाहीत. त्यामुळे पाणी वाहून जाऊन बंधारे रिकामे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे दोन्ही नदी परिसरातील शेती पाण्याअभावी उजाड बनण्याची शक्यता आहे.
कृषीमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी यामध्ये लक्ष घालून नीरा व भीमा नद्या वरील बंधाऱ्यांना ढापे टाकण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी महादेव घाडगे, संग्रामसिंह पाटील, रणधीर मोहिते, केशव बोडके, विक्रम मोहिते, नितीन सरवदे, दादा क्षिरसागर, ताजुद्दीन शेख, राहुल बागल, नवनाथ मोहिते, राजू बळवंतराव, फणिंद्र कांबळे, अशोक बोडके, नंदकुमार शिंदे, शशिकांत सूर्यवंशी आदी शेतकरी व नागरिकांनी केली आहे.
पाणी अडविण्याची गरज
यावर्षीच्या पावसामुळे नीरा नदीवरील गिरवी व ओझरे बंधाऱ्याचे पुराच्या पाण्यामुळे नुकसान झाले होते. तसेच, दोन वर्षांपासून बंधाऱ्यात नादुरुस्तीमुळे पाणी अडवण्यात आले नसल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. चालू वर्षीही पाऊस काळ चांगला झाला असून, पाणीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले आहे. आता फक्त बंधाऱ्यांची ढापे टाकून पाणी अडवणे गरजेचे असल्याचे केशव बोडके, संतोष सुतार शेतकऱ्यांनी सांगितले.
05123, 05124
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.