ऊसतोड मजूर राहुट्या उभारण्यात दंग
नीरा नरसिंहपूर, ता. १५ : जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा २०२५-२६ चा गळीत हंगामाला एक नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्यासाठी विदर्भ, मराठवाड्यासह मध्यप्रदेश येथील ऊसतोड मजुरांच्या टोळ्या जिल्ह्यातील गावोगावी दाखल झाल्या आहेत. सध्या मजूर राहुट्या उभारणीत दंग आहेत. तसेच सहा महिन्यांपासून ठप्प झालेल्या इंदापूर तालुक्यातील बाजारपेठा तसेच आठवडे बाजारात दिवाळीच्या तोंडावर उलाढाल वाढत आहे.
जिल्ह्यातील कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील ट्रक व ट्रॅक्टर एक आठवड्यापूर्वी ऊसतोड मजुरांना आणण्यासाठी विदर्भ, मराठवाड्यात गेले होते. ऊसतोड मजूर दिवाळीपूर्वी आपापली बिऱ्हाडे बांधून कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील गावात टोळ्या दाखल होऊ लागल्या आहेत. नीरा व भीमा नद्यांच्या पट्ट्यातील क्षेत्रावर बहुधा अनेक ऊस कारखान्यांची कमान अवलंबून असल्याने जादा टोळ्या या परिसरात दाखल होऊ लागल्या आहेत. नीरा भीमा सहकारी कारखाना (शहाजीनगर), कर्मयोगी शंकरराव पाटील (बिजवडी), सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील (शंकरनगर), दि सासवड माळी शुगर फॅक्टरी (माळीनगर), विठ्ठलराव शिंदे कारखाना (गंगामाईनगर), भैरवनाथ शुगर (आलेगाव), बारामती अॅग्रो (शेटफळगढे), छत्रपती सहकारी साखर कारखाना (भवानीनगर आदींसह चार जिल्ह्यातील कारखान्यांच्या ऊसतोड मजुरांच्या टोळ्या दाखल होऊ लागल्या आहेत.
नीरा नरसिंहपूर परिसरातील गणेशवाडी, पिंपरी बुद्रुक, गोंदी, लुमेवाडी, ओझरे, गिरवी, हरहर महादेव, टण्णू, आडोबावस्ती, नरसिंहपूर, सराटी, निरनिमगाव, गारअकोले, टाकळी, आलेगाव, शेवरे, संगम, गणेशगाव, तांबवे, माळीनगर आदी गावांत प्रत्येकी दहा ते वीस ऊसतोड मजुरांच्या टोळ्या दाखल होऊ लागल्या आहेत. त्यामुळे या भागातील सर्वच आठवडे बाजार व लहान मोठ्या व्यावसायिकांच्या व्यवसायास सुरुवात झाली आहे.
निवडणुकीत मजुरांची ने-आण ठरणार जिकिरीची
सध्या निवडणुकीच्या हालचालींना वेग येऊ लागला असल्याने नोव्हेंबर किंवा डिसेंबरला मतदान असल्याने ऊसतोड मजुरांना मतदानाला घेऊन जाणे व परत घेऊन येणे जिकिरीचे होणार आहे. त्यानंतरच प्रत्यक्ष गळीत हंगाम सुरू होणार असल्याने ऊसतोड मजुरांना तोपर्यंत सांभाळण्याचे कसब गाडी मालकांचे लागणार आहे.
05134
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.