

नीरा नरसिंहपूर, ता. ३१ ः नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गामध्ये नीरा नरसिंहपूर (ता. इंदापूर) येथील तीर्थक्षेत्र श्री लक्ष्मी- नृसिंह देवस्थानचा समावेश करावा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देवस्थान ट्रस्टच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
नीरा नरसिंहपूर येथील श्री लक्ष्मी- नृसिह देवस्थान हे प्राचीनकालिन हेमाडपंथी देवस्थान आहे. नियोजित नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाचे नीरा नरसिंहपूर भागातून सर्वेक्षण करून समावेश व्हावा, अशी नागरिकांची आग्रही मागणी आहे. या देवस्थानचा समावेश शक्तीपीठ महामार्गाच्या आराखड्यात केल्यास, महाराष्ट्रातील आणखी एक महत्त्वाचे शक्तीपीठ जोडले जाईल. त्यामुळे या परिसराच्या विकासाला चालना मिळेल.
नियोजित नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाला राज्य शासनाकडून तांत्रिक बदल प्रस्तावित असल्याचे समजते. त्यानुसार हा महामार्ग धाराशीव ते बार्शी- माढा- नीरा नरसिंहपूर (शक्तीपीठ) असा पुढे नेण्याचे विचार व्हावा. याबाबत सकारात्मक विचार करून श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान हे शक्तीपीठ महामार्गाशी जोडण्याबाबत आवश्यक सर्वेक्षण करण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात यावेत, अशी विनंती श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थानच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या निवेदनाची प्रत व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ लि. मुंबई यांनाही दिली आहे.