ओतूरमध्ये दोन बांगलादेशींना अटक
ओतूर, ता. ८ : बनावट कागदपत्रांचा वापर करून ओतूर (ता. जुन्नर) येथे बेकायदा वास्तव्य करणाऱ्या दोन बांगलादेशी नागरिकांना दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) ताब्यात घेतले. बुधवारी रात्री कारवाई करून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
ताजमीर मोश्ताफा अन्सारी (वय २८), मोहम्मद अलिमूल गुलाम अन्सारी (वय २७, रा. ओतूर, मूळ रा. बोकराई, जि. शारखीरा, बांगलादेश) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस कर्मचारी रोहित बोंबले यांनी ओतूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. परकीय नागरिक कायदा १९४६ कलम १४, पारपत्र अधिनियम १९६७ नियम ३ व ६, परकीय नागरिक आदेश १९५० चे कलम ३ (अ) यानुसार दोघांविरुद्ध ओतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
ओतूर येथे दोन बांगलादेशी नागरिक बेकायदा वास्तव करत असल्याची खबर ‘एटीएस’ला मिळाली होती. त्यानुसार ‘एटीएस’च्या पथकाने तांत्रिक तपासावरून अधिक माहिती मिळविली. त्यानंतर ओतूर पोलिसांच्या मदतीने पहिल्यांदा ताजमीर यास ताब्यात घेतले. पथकाने त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर त्याचा साथीदार मोहम्मद अन्सारी याचीही माहिती पुढे आली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून बनावट भारतीय आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, तसेच मोबाईल, कालबाह्य झालेले बांगलादेशी पासपोर्ट, व्हिसा जप्त केले.
दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतलेले आरोपी हे मागील पंधरा वर्षांपासून ओतूरमध्ये वास्तव्य करत असल्याचे समोर आले आहे. संबंधित व्यक्ती परिसरात पेंटिंगची कामे करत होते. त्यांना ओतूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांकडून दोघांविरोधात पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. त्यांचा देशात येण्यामागील उद्देशाची चौकशीही केली जात आहे.
ही कारवाई दहशतवाद विरोधी पथकाच्या पोलिस निरीक्षक सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक दत्तात्रेय दराडे, हेड कॉन्स्टेबल शरद जाधव, तांदळवाडे ,तसेच ओतूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एल. जी. थाटे, पोलिस उपनिरीक्षक संदीप आमने, पोलिस हवालदार दिनेश साबळे, नामदेव बांबळे, महेश पठारे, संदीप लांडे, पालवे, संतोष भोसले, किशोर बर्डे, ज्योतिराम पवार, विशाल गोडसे यांच्या पथकाने केली. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक थाटे करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.