डिंगोरेतील विद्यार्थ्यांनी घेतला मतदानाचा अनुभव
ओतूर, ता. २७ : डिंगोरे (ता. जुन्नर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शनिवारी बालसंसद निवडणुकीचे आयोजन करण्यात आले. या निवडणुकीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ईव्हीएम मशिन प्रमाणे मोबाईलवर मतदान करण्याचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला.
लोकशाहीचे धडे विद्यार्थ्यांना बालवयातच मिळावे आणि ते सुज्ञ नागरिक व्हावे या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला. खऱ्याखुऱ्या निवडणुकीचे आकर्षण लहान मुलांना असते. त्यांचे ते कुतूहल पूर्ण करण्याचा प्रयत्न जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिंगोरेत करण्यात आला. मतदान करताना विद्यार्थ्यांचा आनंद ओसंडून वाहत होता. अगदी इयत्ता पहिलीचे विद्यार्थीही आत्मविश्वासाने मतदान करताना दिसून आले.
या उपक्रमाचे सर्व नियोजन शाळेचे मुख्याध्यापक संजय माळवे, भैरव कराळे, चंद्रशेखर नलावडे, मनीषा गायकर, शिक्षणा फाउंडेशनचे श्रीकृष्ण दुधवडे यांनी केले.
यावेळी तंटामुक्ती समिती अध्यक्ष राजेंद्र सुकाळे, रमेश सोनवणे, व्यवस्थापन समिती अध्यक्ष गणेश आमले, उपाध्यक्षा केतकी सुकाळे, सदस्य वैशाली लोहोटे, सोनाली शिंदे, नितीन आमले, विशाल आमले उपस्थित होते.
या निवडणुकीत उमेदवार म्हणून उर्वी हांडे, आदिती लोहोटे, रुद्र लोहोटे, सार्थक सुकाळे, सई फोपसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मतमोजणी नंतर सुकाळे याची बहुमताने शाळेचा मुख्यमंत्री म्हणून निवड झाली.