वीर सावरकर विद्यालयात शिक्षक-पालक सभा
ओतूर, ता. ३ : येथील श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वीर सावरकर विद्यालय, बल्लाळवाडी (पांगरीमाथा) येथे पाचवी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी पहिली शिक्षक पालक सहविचार सभा शनिवारी (ता. २) पार पडली.
मुख्याध्यापक संतोष झावरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सभेत मार्गदर्शन करताना बल्लाळवाडीचे माजी उपसरपंच सुधीर महाराज घोलप यांनी म्हणाले की, शाळेचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर शिक्षक, पालक व विद्यार्थी यांचा समन्वय असणे गरजेचे आहे. शिक्षक गुणवत्तेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडवितात, तसेच पालकांनीही आपल्या मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष दिले पाहिजे व त्यांच्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण केला पाहिजे.
दरम्यान, विद्यार्थ्यांची गुणवत्ता, नवीन शैक्षणिक धोरण, विद्यालयात राबवले जाणारे उपक्रम, तंबाखू मुक्त आरोग्यमय शाळा, शिस्त व संस्कार या विषयावर मुख्याध्यापक झावरे, महेश थोरात, तुकाराम हजारे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी शिक्षक-पालक संघाची नवीन कार्यकारिणी तयार करण्यात आली. या सभेचे प्रास्ताविक महेश थोरात व आभार प्रदर्शन दीपक बोचरे यांनी केले. यावेळी नामदेव खोकले, अशोक लोखंडे, अरविंद काळे, दत्तात्रेय घोलप, पुष्पा घोलप यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.