शेतमाल प्रक्रिया उद्योगामुळे जुन्नर बनले ‘रोल मॉडेल’
जुन्नर तालुका उत्पादनात पुढे आहे; मात्र उत्पन्नात मागे का? कांदा, टोमॅटो, द्राक्षे आणि भाजीपाला वर्गीय पिकांनी शेतं हिरवीगार दिसतात पण शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान का नाही? कारण स्पष्ट आहे. उत्पादन आहे, पण प्रक्रिया नाही; पीक आहे, पण नियोजन नाही. यामुळे सध्या शेतमाल प्रक्रिया उद्योग काळाची गरज बनला आहे. योग्य नियोजन, सहकार्य आणि शासकीय पाठबळ मिळाले तर जुन्नर तालुका कृषी प्रक्रियेत समृद्धीचा ‘रोल मॉडेल’ ठरू शकतो.
- पराग जगताप, ओतूर
जुन्नर तालुका कृषी प्रधान तालुका असून, खोडद येथील महाकाय दुर्बीणमुळे (जीएमआरटी) मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहत निर्माण होऊ शकत नसल्याने सर्व तालुक्यातील जनता प्रमुख्याने शेती व शेती जोड धंद्यावर अवलंबून आहे.
उद्योग व्यवसायाला चालना
ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक ठेवल्या बरोबरच जुन्नर तालुक्यात नैसर्गिक सृष्टी सौंदर्याने मोठ्या प्रमाणात असून त्यामुळे राज्य सरकारने तालुका पर्यटन तालुका घोषित केले आहे. तालुक्यात कुकडी पाटबंधारे प्रकल्पाअंतर्गत पाच धरणे झाल्याने तालुक्यातील बहुतेक भाग हा बारमाही बागायती झाला आहे. तालुक्यातील बहुतेक जनता शेती व शेती जोड धंद्यावर अवलंबून आहे. तालुक्यात शेतीवर आधारित उद्योग व्यवसायाला मोठी चालना असून, शेतीला आवश्यक सर्वच उत्पादने व शेतीमाल प्रक्रिया उद्योग तसेच शेतीशी पूरक व्यवसायासाठी येणाऱ्या काळात जुन्नर तालुक्यात मोठी चालना मिळणार आहे.
उद्योग उभारण्याठी पावले टाकण्याची गरज
शेती उद्योगाबरोबरच जुन्नर तालुक्यात असलेली भोगौलिक, ऐतिहासिक व धार्मिक पर्यटन स्थाळांमुळे तालुक्यात पर्यटन उद्योग मोठ्या प्रमाणात विकसित होणार असून, जुन्नर तालुक्याची भविष्यातील ओळख ही शेती प्रक्रिया उद्योग व पर्यटन इंडस्ट्री, अशी राहणार असल्याने तालुक्यातील जनतेने त्या दृष्टिकोनातून विचार करून फक्त शेतीवर अवलंबून न राहता आपले आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी शेती प्रक्रिया उद्योग व पर्यटनाशी संबंधित व्यवसाय उद्योग उभारण्याच्या दृष्टीने पावले टाकणे गरजेचे आहे.
बाजारभावाच्या चढउताराची समस्या
जुन्नर तालुक्यात पाच धरणे असल्याने बागायती क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आहे. तालुक्यात कांदा, टोमॅटो, द्राक्षे तसेच भाजीपाला वर्गीय पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर येथे घेतले जाते. मेहनती शेतकरी, अनुकूल हवामान आणि बाजारपेठेची जवळीक असूनही, शेतीमालाला अपेक्षित दर न मिळणे, हंगामी बाजारभावाचा चढउतार आणि साठवणुकी अभावी होणारे नुकसान ही जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांची आजही मुख्य समस्या आहे.
द्राक्षांसाठी स्थानिक पातळीवर मर्यादित सुविधा
शेतीमाल प्रक्रिया उद्योगांची उभारणी ही जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना काळाची गरज बनली आहे. जुन्नर तालुक्याचे कृषी वास्तव असे आहे की जुन्नरमध्ये कांद्याचे उत्पादन मुबलक प्रमाणात होते. दर्जेदार कांदा उत्पादन होत असल्याने साठवणूक मोठ्या प्रमाणात होते. मात्र, बाजारभावाची शाश्वती नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी दरवर्षी अडचणीत येत आहे. तर कांद्यावर प्रक्रिया करून मोठ्या प्रमाणात बाजारभाव मिळू शकतो. मात्र प्रक्रिया उद्योग नसल्याने कांद्याचे बाजारभाव कोसळतात व कांदा उत्पादक अडचणीत येतो. टोमॅटो व भाजीपाला वर्गीय पिकांमध्ये नासाडीचे प्रमाण जास्त असून शेतकऱ्यांना अनेकदा उत्पादन खर्चही वसूल होत नाही. द्राक्षांसारख्या निर्यातक्षम पिकांसाठी दर्जा, ग्रेडिंग आणि पॅकिंगची आवश्यकता असते; पण स्थानिक पातळीवर त्या सुविधा मर्यादित आहेत.
प्रक्रिया उद्योगामुळे या पिकांचे होईल मूल्यवर्धन
कांदा : कांदा पावडर, कांदा फ्लेक्स, सुकवलेला कांदा
टोमॅटो : केचअप, सॉस, प्युरी, सुकवलेले टोमॅटो
फळे : जॅम, जेली, स्क्वॅश, फळरस
धान्ये : पीठ गिरण्या, डाळ मिल, पोहे, चिवडा
द्राक्ष : ज्यूस,मनुका, वाइन
आंबा : आमरस, पल्प
डाळिंब : प्रक्रिया व पॅकिंग
फुलशेती : हार, गुलकंद,सजावटीसाठी फुले,जाम
गूळ व सेंद्रिय गूळ उद्योग,पापड, लोणचे, मसाले
शेवया, सांडगे,मध उत्पादन इत्यादी सह
भाजीपाला प्रक्रिया :
कापणी-पश्चात ग्रेडिंग, पॅकिंग, फ्रोजन उत्पादने, रेडी टू कुक पदार्थ यामुळे शेतकऱ्यांना स्थिर बाजारपेठ मिळून उत्पन्न वाढू शकते. जुन्नरसाठी आता केवळ शेती पुरेशी नाही तर शेती प्रक्रिया उद्योग हीच भविष्याची गुरुकिल्ली आहे.
रोजगार व स्थानिक अर्थव्यवस्था
शेती उत्पादनावर प्रक्रिया उद्योग उभे राहिल्यास जुन्नर तालुक्यातील युवक-युवतींना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. महिला बचत गटांमार्फत पापड, लोणची, भाजीपाला प्रक्रिया यांसारखे लघुउद्योग मोठ्या प्रमाणात विकसित होऊ शकतात. परिणामी शहरांकडे होणारे स्थलांतर कमी होईल. तालुक्यात शेतीमाल प्रक्रिया उद्योग काय करणे आवश्यक आहे.
‘जुन्नर ब्रँड’ची गरज
तालुका पातळीवर कॉमन प्रोसेसिंग सेंटर व कोल्ड स्टोरेज उभारणी, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO) सक्षम करणे. पीएमएफएमइ
(PMFME), एमएसएमइ (MSME) मुद्रा अशा शासकीय योजनांचा प्रभावी वापर आवश्यक असून, प्रशिक्षण, तंत्रज्ञान आणि बाजारपेठ यांचा समन्वय साधणे आवश्यक आहे. ‘जुन्नर ब्रँड’ म्हणून प्रक्रिया उत्पादनांची ओळख निर्माण करणे. तसेच इतर ही पिकांमध्ये जुन्नर ब्रँड निर्माण करणे काळाची गरज आहे.
जुन्नर तालुक्यातील कांदा, टोमॅटो, द्राक्षे व भाजीपाला वर्गीय पिकांच्या क्षमतेचा पूर्ण उपयोग करायचा असेल तर शेतीमाल प्रक्रिया उद्योगांना प्राधान्य देणे अपरिहार्य आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

