ओतूरच्या वाघिरे महाविद्यालयाचे तळेरान येथे श्रमसंस्कार शिबिर
ओतूर, ता. १८ ः ओतूर (ता. जुन्नर) येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या मार्गदर्शनाखाली “शाश्वत विकासासाठी युवक : पाणलोट व पडीक जमीन व्यवस्थापन” या संकल्पनेवर आधारित विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन तळेरान (ता. जुन्नर) येथे करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. राजेंद्र आंबवणे व प्राचार्य डॉ. रमेश शिरसाट यांनी दिली.
सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन बुधवारी (ता. १५) झाले. यावेळी उपप्राचार्य डॉ. कल्याण सोनावणे तसेच तळेरानचे सरपंच गोविंद साबळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्रास्ताविकामध्ये प्रा. राजेंद्र आंबवणे यांनी शिबिराच्या सात दिवसांच्या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. या शिबिरामध्ये ग्रामस्वच्छता, वृक्षारोपण, पाणी संवर्धन, पाणलोट क्षेत्र विकास, पडीक जमिनीचे व्यवस्थापन, सामाजिक जनजागृती, आरोग्य व स्वच्छता विषयक उपक्रम, तसेच विविध सामाजिक प्रश्नांवर आधारित प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक, तळेरान गावातील ग्रामस्थ तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते. सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. विनायक कुंडलिक यांनी केले. तर आभार प्रा. सुवर्णा डुंबरे यांनी मानले.

