

ओतूर, ता. १२ : जुन्नर तालुक्यातील खामुंडी गावच्या हद्दीत अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर शैक्षणिक सहलीच्या एसटी बस महामार्गाच्या कडेला मोरीच्या कठड्याला धडकल्यामुळे उलटली. या अपघातात १९ विद्यार्थी व शिक्षक गंभीर जखमी झाले असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक एल. जी. थाटे यांनी दिली. हा अपघात गुरुवारी (ता. १२) सकाळी सातच्या सुमारास घडला.
श्रावणी नवथर, कृष्णा नवथर, सिद्धांत मुसळे, सार्थक कोकाटे, जिया शेख, ईश्वरी लहारे, सागर फावले, अनुराज काळे, रितेश मोरे, स्नेहल खंडागळे, शुभम गादूके, पायल कचरे, काव्या गोसावी, आर्यन नवथर हे व सतीश धनवडे,रामनाथ खरड, ज्योती कोठुके,मोहिनी चंदन, रवींद्र चंदन हे पाच शिक्षक व कर्मचारी जखमी झाले आहेत. इतर काही नावे समजू शकली नाही. याबाबतची माहिती अशी की, अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील पिंपरी शहाली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पहिले ते सातवीच्या ५३ विद्यार्थ्यांना घेऊन शैक्षणिक सहलीनिमित्त जुन्नर तालुक्यातील अष्टविनायक गणपती ओझर व लेण्याद्री येथे दर्शनासाठी बुधवारी रात्री बसने येत होते. जुन्नर तालुक्यात खामुंडी गावच्या हद्दीत गुरुवारी सकाळी अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोरीला धडकून उलटली. अपघातानंतर मुलांचा मोठा आवाज आणि आरडाओरडा झाला. त्यामुळे खामुंडी व डुंबरवाडी परिसरातील नागरिकांनी या अपघातग्रस्त बसमधील जखमी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना त्वरित सुरक्षित बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. यावेळी परिसरातील नागरिकांनी व ओतूर पोलिसांनी अपघातग्रस्तांना मोठी मदत केली.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून शैक्षणिक सहलीच्या एसटी बस अपघातातील प्रत्येक जखमीला एक हजारांची मदत देण्यात आली आहे. एकूण जखमी १५ विद्यार्थी आणि ४ शिक्षक यांच्या उपचारासाठी तातडीची मदत देण्यात आली आहे. गरज वाटल्यास पुढे जाऊन उपचार घ्यावे लागले तर त्यासाठी पी फॉर्म भरून दिला आहे. उपचारासाठी दाखल विद्यार्थी वगळता अन्य ३९ विद्यार्थ्यांना नारायणगाव आगाराच्या एसटी बसने गावी पाठवण्यात आले आहे.
- वसंत अरगडे, प्रमुख, नारायणगाव एसटी आगार
1506
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.