

ओझर, ता. ११ : जुन्नर तालुक्यात कांदा काढणीची कामे सध्या वेगात सुरू आहेत. मध्यप्रदेश, छत्तीसगड तसेच विविध राज्यांमधून कामाच्या शोधात आलेले परप्रांतीय मजूर शेतकऱ्यांना कांदे काढणीच्या कामाला हातभार लावत आहेत.
यंदा साखर कारखान्याचा गळीत हंगाम दोन महिने अगोदरच आटोपल्याने महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेला ऊसतोडणी कामगार आपल्या गावांकडे न जाता कांदे काढणीच्या कामाला जुंपला आहे. एक एकर कांदे काढणीसाठी मजुरी पोटी सध्या १५ ते १६ हजार रुपये शेतकऱ्याला मोजावे लागतात. पावसाच्या तडाख्यातून शेतमालाला वाचवण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याची लगबग सुरू आहे. कडाक्याच्या उन्हात स्थानिक मजुरांची वानवा असताना बाहेरून आलेले मजूर शेतकऱ्यांना शेती कामासाठी उपयोगी पडत आहेत.
उन्हाचा पारा ३५ ते ४० अंशावर असताना पोटाची खळगी भरण्यासाठी मजूर शेतात राबत आहेत. उन्हाच्या कडाक्यात दुपारच्या वेळी थंडगार आइस्क्रीमचा आस्वाद घेत आहेत.