जिल्हाधिकाऱ्यांना तत्काळ अहवाल सादर करा

जिल्हाधिकाऱ्यांना तत्काळ अहवाल सादर करा
Published on

पाबळ, ता.२८ : ''अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करावी. तत्काळ पंचनामे पूर्ण करून अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करा. एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहू देऊ नका. शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत पाठपुरावा करणार आहे'', असे आश्‍वासन सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिले.

टाकळी हाजी, पाबळ, कवठे येमाई, सविंदणे, फाकटे, चांडोह, निमगाव दुडे या परिसरातील गावांमध्ये गारपिटीसह मुसळधार पाऊस झाला. यामुळे डाळिंब, द्राक्ष, पपई, सीताफळाच्या बागा कोलमडून पडल्या. या नुकसानीची सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सोमवारी (ता.२७) पाहणी केली. पाहणीप्रसंगी प्रांताधिकारी हरेश सुळ, अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे, गट विस्तार अधिकारी बाळासाहेब गावडे उपस्थित होते.

गारपिटी तसेच पावसामुळे टाकळी हाजी, माळवाडी, उचाळे वस्ती, शिनगरवाडी, डोंगरगण परिसरातील डाळिंब, पेरू, पपई, सीताफळ, द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. विविध पिके तसेच फळबागा कोलमडून पडल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. या नुकसानीचे महसूल, कृषी, ग्रामविकास विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. यावेळी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली.

यावेळी शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गावडे, सरपंच, उपसरपंच व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिरूर तालुक्यातील नुकसानीचे स्थळ पाहणी करून पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. नुकसानग्रस्त एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही. याची काळजी घेण्याच्या सूचना महसूल, ग्रामविकास, कृषी खात्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. तत्काळ पंचनामे पूर्ण करून अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात येईल.
- हरेश सुळ, प्रांताधिकारी, शिरूर


चार एकर क्षेत्रात असलेली द्राक्ष बाग लाखो रुपये खर्च करून फुलविली होती. साधारणपणे पंचवीस लाख रुपयाचे उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा असताना गारपिटीच्या अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने स्वप्नांची राख रांगोळी झाली. सरकारने तत्काळ मदत न केल्यास जगणे अवघड होईल.
- शहाजी सोदक, द्राक्ष बागायतदार, टाकळी हाजी

टाकळी हाजी सह बेट भागात कांदा, बटाटा, फ्लॉवर, मका पिकांसह, द्राक्ष, डाळिंब फळबाग, भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही ठिकाणी पशुधनाचा मृत्यू झाला आहे. या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून जाचक अटी न लावता नुकसान भरपाई मिळावी.
- अरुणा घोडे, सरपंच, टाकळी हाजी
00309

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com