कवठेमधील श्री येमाई देवीचा पालखी सोहळा उत्साहात

कवठेमधील श्री येमाई देवीचा पालखी सोहळा उत्साहात

पाबळ, ता. २४ : सनईच्या सुमधुर सुरावर ढोल-ताशा, संबळ, डफ, झांज पथक यांसारख्या पारंपरिक वाद्यांचा गजर, आकर्षक फुलांनी सजविलेली श्री येमाई देवीची पालखी, भंडाऱ्याची उधळण करत अंबाबाईचा उदो उदो... जगदंबेचा उदो उदो चा जयघोष अशा भक्तीमय वातावरणात कवठे येमाई (ता. शिरूर) येथील श्री येमाई देवीचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

कवठे येमाई (ता. शिरूर) येथील श्री येमाई देवीच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त मोठ्या संख्येने येत असतात. नवसाला पावणारे कुलदैवत म्हणून येमाई देवीची ख्याती आहे. दरवर्षी चैत्र पौर्णिमेला देवीचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. गावापासून तीन किलोमीटर अंतरावर श्री येमाई देवीचे भव्य मंदिर आहे. मंगळवारी (ता. २३) सकाळी श्री येमाई देवीला अभिषेक घातला. यावेळी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यानंतर गावातून ढोल-ताशा यांसारख्या पारंपरिक वाद्यांच्या गजरात श्री येमाई देवीच्या पालखी सोहळ्यास सुरुवात झाली. हा सोहळा पायी तीन किलोमीटर अनवाणी पायाने गावातून मंदिरात नेण्यात आला. मंदिरात गेल्यावर ओलांडा व आरती झाली. उन्हाची तीव्रता प्रचंड वाढलेली असल्याने माजी सरपंच दीपक रत्नपारखी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या भाविकांसाठी थंडगार मठ्ठा उपलब्ध करून दिला होता.
चैत्र पौर्णिमेला यात्रेनिमित्त मंदिरावर व मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई व विविध रंगी फुलांची सजावट केली होती. त्याचबरोबर यात्राकाळात देवीची पालखी मिरवणूक, ढोल लेझीम स्पर्धा, दारू काम, बैलगाडा शर्यती, करमणुकीसाठी लोकनाट्य तमाशा, चितपट निकाली कुस्त्यांचा जंगी आखाडा यांसारख्या विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याची माहिती श्री येमाई देवी यात्रा कमिटी व देवस्थान ट्रस्टच्या वतीने देण्यात आली.

श्री येमाई देवीच्या मंदिराची वैशिष्ट्ये

श्री येमाई देवी मंदिर तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. मंदिर परिसरात सभोवताली असलेले मोठमोठे वटवृक्ष, मंदिराच्या उत्तरेस पायऱ्या असलेली ऐतिहासिक बारव (विहीर), मंदिरातील प्रशस्त गाभारा, समोर असलेला मोठा सभामंडप, सभोवताली असलेला मोठ्या तटबंदीचा वाडा, त्यास पूर्वेकडून व उत्तरेकडून असणारी भव्य प्रवेश द्वारे, मंदिराच्या समोरच दोन मोठ्या घाट्या (घंटा) असून पूर्वेकडील दरवाज्याजवळ दोन मोठे नगारे आहेत. मंदिराच्या आवारात तीन उंच दीपमाळा असून चैत्र पौर्णिमेच्या व नवरात्रोत्सवाच्या काळात त्या पेटविल्या जातात. देवीच्या मंदिराच्या मागील बाजूस साधारण पंधरा फूट खोल दगडी बांधकामातील श्री महादेवाचे ऐतिहासिक मंदिर त्या मधील दगडी पिंड व दगडी नंदी हे या मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com