नवीन पोलिस ठाण्याचा प्रस्ताव कागदावरच

नवीन पोलिस ठाण्याचा प्रस्ताव कागदावरच
Published on

सागर रोकडे : सकाळ वृत्तसेवा
कवठे येमाई, ता. ३०९ : गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने टाकळी हाजी (ता. शिरूर) येथे नवीन पोलिस ठाण्याच्या स्थापनेचा सुधारित प्रस्ताव तत्कालीन पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी मे २०२२ ला पोलिस महासंचालक यांच्या माध्यमातून शासनास पाठवला होता. मात्र, तब्बल तीन वर्षे उलटली तरी अद्याप या प्रस्तावावर कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे टाकळी हाजी पोलिस ठाण्याचा प्रस्ताव अजून किती वर्षे कागदावरच राहणार? असा सवाल नागरिकांमधून व्यक्त केला आहे.

टाकळी हाजी आणि आसपासच्या २५ गावांमध्ये मागील काही वर्षांत लुटमार, दरोडे, आर्थिक गुन्हे, महिलांवरील अत्याचार आणि अपघातांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. सध्या या भागातील नागरिकांना शिरूर, शिक्रापूर किंवा रांजणगाव या लांबच्या पोलिस ठाण्यांमध्ये जावे लागते. यामुळे वेळेचा अपव्यय तर होतोच, पण तातडीची मदत मिळण्यातही अडथळे येतात. याच पार्श्वभूमीवर, शिरूर, शिक्रापूर आणि रांजणगाव पोलिस ठाण्यांचे विभाजन करून टाकळी हाजी येथे नवीन पोलिस ठाण्याची निर्मिती करावी, असा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता.

प्रस्तावित टाकळी हाजी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मलठण, अण्णापूर, टाकळी हाजी, रावडेवाडी, सविंदणे, पिंपरखेड, कवठे येमाईसह २५ गावांचा समावेश होणार आहे. या भागात मळगंगा माता मंदिर (टाकळी हाजी) आणि येमाई माता मंदिर (कवठे येमाई) ही दोन मोठी धार्मिक स्थळे आहेत. येथे एप्रिल आणि मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणात यात्रा भरते. त्यामुळे दरवर्षी पोलिस बंदोबस्त ठेवावा लागतो.

याशिवाय, या भागातून राज्य महामार्ग बेल्हा-जेजुरी, अष्टविनायक महामार्ग तसेच मलठण-कवठे येमाई-पारगाव-मंचर-भीमाशंकर हा मुख्य मार्ग जातो. या ठिकाणी सातत्याने वाहतूक कोंडी होते. तसेच गेल्या काही दिवसांत अपघातांची संख्या वाढली आहे. टाकळी हाजीला अहिल्यानगर जिल्ह्याची सीमा लागून असल्याने अहिल्यानगर आणि पुणे या मोठ्या शहरांमधील गुन्हेगारांचा या भागातून वावर असल्याने पोलिसांना वारंवार नाकाबंदी करावी लागते. यामुळे नवीन पोलिस ठाणे आवश्यक असल्याचे शासनाच्या वारंवार निदर्शनास आणून दिले जात आहे.

आणखी किती वर्षे वाट पाहावी लागणार?
टाकळी हाजी पोलिस ठाण्याची गरज प्रशासनाने मान्य केली असली, तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी ठोस पावले उचलली जात नसल्याचे दिसत आहे. स्थानिक लोक प्रतिनिधींचे ही या मागणीकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे टाकळी हाजी पोलिस ठाण्याचा प्रस्ताव शासनाच्या टेबलवर अजून किती काळ धूळ खात पडून राहणार? नागरिकांना त्यांच्या सुरक्षेसाठी आणखी किती वर्षे वाट पाहावी लागणार? आणि वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न कधी दिसून येणार? असे सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

टाकळी हाजी परिसरातील गुन्ह्यांची संख्या
वर्ष गुन्ह्यांची संख्या
२०१९ ३१३
२०२० ३४८
२०२१ ३९१
२०२२ १७९
२०२३ २२२
२०२४ २३१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com