

पाबळ, ता. ४ : शिरूर तालुक्यातील पाबळ व कान्हूर मेसाई परिसरातील विहिरींनी तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्याचा गंभीर तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे गावाचा पाणीपुरवठा विस्कळित झाला असून, ग्रामस्थांना पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
पाबळ व कान्हूर मेसाई ही गावे दुष्काळग्रस्त म्हणून ओळखली जातात. उन्हाळ्यात येथील पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य विहिरी आणि इतर जलस्रोत कोरडे पडतात. त्यामुळे गाव व वाड्यावस्त्यांना पाणी मिळणे कठीण झाले आहे. याशिवाय जनावरांसाठी चारा टंचाईचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. डोंगराळ भौगोलिक रचनेमुळे काही वाड्यांपर्यंत पाणी पोहोचवणेही कठीण झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे हाल वाढले असून, त्वरित टँकरची सुविधा सुरू न केल्यास परिस्थिती आणखी गंभीर होईल, अशी चिंता स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे शासनाने तातडीने प्रस्ताव मंजूर करून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
यासंदर्भात पाबळ व कान्हूर मेसाई ग्रामपंचायतींच्या वतीने गटविकास अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केला असून, लवकर निर्णय न घेतल्यास परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता आहे, असे पाबळचे सरपंच सोपान जाधव व कान्हूर मेसाईचे उपसरपंच योगेश पुंडे यांनी सांगितले.
गावातील विहिरींनी तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. वाड्यावस्त्यांमध्ये पाणी पोहोचवणे कठीण झाले आहे. शासनाने लवकरात लवकर टँकर मंजूर करून गावातील नागरिकांना दिलासा द्यावा.
- सोपान जाधव, सरपंच, पाबळ (ता. शिरूर)
पाबळ व कान्हूर मेसाई गावांचा टँकर सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव प्राप्त झाला असून, त्याची तपासणी करून तहसीलदारांच्या माध्यमातून मंजुरीसाठी पाठवण्यात येईल. लवकरच टँकर सुरू करण्यासाठी मंजुरी मिळेल.
- महेश डोके, गटविकास अधिकारी, शिरूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.