अष्टविनायक महामार्गावर वाढले अपघात
कवठे येमाई, ता. २५ : शिरूर तालुक्यातील अष्टविनायक महामार्गावर कवठे येमाई ते मलठण दरम्यानचा रस्ता सध्या मृत्यूचा सापळा बनला आहे. तीन महिन्यांत आठ नागरिकांनी या मार्गावर जीव गमावला असून, वर्षभरातील मृतांचा आकडा पंधराहून अधिक झाला आहे. या अपघातांनी परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
अपघातांत अनेक तरुण आणि कुटुंबांचे कर्ते पुरुष मृत्युमुखी पडले. परिणामी, अनेक कुटुंबे उघडी पडली आहेत. अनेक आई-वडिलांचा आधार हरवला, संसार भरकटले, तर मुलांचे भवितव्य अंधारात गेले. मात्र, एसी केबिनमध्ये बसून गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या अधिकाऱ्यांना या परिस्थितीचे गांभीर्य नसल्याचे दिसत आहे.
महामार्गावरील भरधाव अवजड वाहने, ऊस भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉली, रात्री अंधारात रिफ्लेक्टरशिवाय फिरणारे ट्रॅक्टर आणि रस्त्यालगत खुलेआम सुरु असलेली अवैध दारूविक्री हे घटक अपघातांना निमंत्रण देत आहेत. फूटपाथची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी गतिरोधक नाहीत, दिशा दर्शक फलक नाहीत. यामुळे शाळकरी मुलांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकजण या रस्त्यावर रोज जीव मुठीत घेऊन चालतो आहे.
‘सकाळ’ने याआधीही या समस्येवर प्रकाश टाकला होता. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन उपअभियंता श्रीपाद बलशेठवार यांनी ‘सेफ्टी ऑडिट करून उपाययोजना राबवू,’ अशी प्रतिक्रिया दिली होती. अधिकाऱ्यांनी थर्माप्लास्टिक गतिरोधक, दिशा दर्शक फलक, कठडे आणि बसथांबे दुरुस्त करण्याची ग्वाही दिली होती.
मात्र, प्रत्यक्षात फक्त जुजबी डागडुजीच झाली. इचकेवाडी येथील जुना बसथांबा काढण्यात आला, पण दोन महिने उलटून गेले तरी नवा बसथांबा लावलेला नाही. ना पाहणी झाली, ना ठोस कृती. त्यामुळे प्रशासनाने तातडीने सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना राबविण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.
अपघात वाढण्याची मुख्य कारणे
- अवजड व ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांचा भरधाव वेग आणि नियमांचे उल्लंघन
- अष्टविनायक महामार्गालगतच्या आणि आजूबाजूच्या गावांमध्ये अवैध दारू विक्री
- दिशादर्शक फलकांची मोडतोड आणि रस्त्यावरील कठड्यांचा अभाव
- साइड पट्टयांची दुरवस्था झाल्याने रस्ता बनला धोकादायक
- कवठे येमाई व मलठण येथील आठवडे बाजार रस्त्यालगत भरल्याने होते वाहतूक कोंडी
- महामार्गावर होणारे नियमांचे उल्लंघन
अष्टविनायक महामार्गावरील वाढते अपघात अत्यंत गंभीर बाब आहे. गेल्या वर्षभरात १५ जणांचा मृत्यू होणे हे केवळ दुर्दैवीच नाही, तर व्यवस्थेच्या अपयशाचे उदाहरण आहे. संबंधित विभागाने या प्रकरणाची दखल घेऊन तत्काळ रस्त्याची पाहणी करावी आणि अपघातप्रवण आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक, दिशादर्शक फलक, फुटपाथ आणि इतर सुरक्षितता उपाययोजना राबवाव्यात. नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या हलगर्जीपणाला आता आळा घालणे गरजेचे आहे.
डॉ. सुभाष पोकळे, माजी सदस्य, पंचायत समिती शिरूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.