शिरूरला महसूल लोक अदालत
कवठे येमाई, ता. ३१ : शिरूर तहसीलदार कार्यालय तसेच सर्व मंडल अधिकारी कार्यालयांमध्ये सोमवारी (ता. ९ जून) ‘महसूल लोक अदालत’ आयोजित केली आहे. महसूल न्यायप्रक्रियेतील प्रलंबित दाव्यांना सामंजस्याने आणि तडजोडीतून न्याय मिळवून देण्यासाठी लोक अदालत पार पडणार असल्याची माहिती तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी नायब तहसीलदार प्रकाश मुसळे, विनय कौलवकर, पुरवठा अधिकारी सदाशिव व्हनमाने उपस्थित होते.
महसूल विभागात उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मंडल अधिकारी यांच्याकडे नवीन रस्ता मागणी, रस्ता खुला करणे, हरकत फेरफार व दुरुस्ती प्रकरणे आणि अन्य जमीन संबंधित दावे अनेकदा वर्षानुवर्षे प्रलंबित राहतात. न्याय मिळवण्यासाठी नागरिकांना वेळ, पैसा आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. मात्र, या लोक अदालतीत दोन्ही पक्षकारांचे एकमत झाल्यास तडजोडीतून दावे कायमस्वरूपी निकाली काढले जाणार आहे. या उपक्रमामुळे महसूल विभागाच्या अर्धन्यायिक कामकाजावरचा ताण कमी होईल आणि नागरिकांना सहज, सुलभ आणि जलद न्याय मिळवता येईल, असा विश्वास म्हस्के यांनी व्यक्त केला.
लोक अदालतीचे फायदे
• प्रकरणे दाखल करण्यासाठी फी लागत नाही.
• आर्थिकदृष्ट्या सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळतो.
• तडजोडीनुसार दावे निकाली काढल्यामुळे पुन्हा वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्याची गरज भासत नाही.
• वेळेची व पैशांची बचत होऊन वादविवाद टळतात.
• न्याय जलद मिळतो आणि दोन्ही पक्षकारांना समाधान मिळते.
लोक अदालतीच्या माध्यमातून प्रलंबित दावे निकालात काढण्याची ही सुवर्णसंधी आहे. याबाबतचे अर्ज मंडल स्तरावर व तहसील कार्यालयात दाखल करता येणार आहेत. सर्व पक्षकारांनी लवकरात लवकर आपले प्रकरण लोक अदालतीत मांडून सामंजस्याने मार्ग काढावा.
-बाळासाहेब म्हस्के, तहसीलदार शिरूर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.