पाबळ परिसरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट

पाबळ परिसरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट

Published on

पाबळ, ता. ५ : पाबळ परिसरातील गावांमध्ये गावठी व बनावट दारू विक्रीसह गुटखा, मावा आणि तंबाखूजन्य पदार्थांची सर्रासपणे विक्री सुरू असून, संबंधित विभागांचे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे परिसरात गैरवर्तनाचे प्रकार वाढत असून, स्थानिक नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या अवैध धंद्यांवर तातडीने कठोर कारवाई करून त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
बेल्हा-जेजुरी महामार्गालगत असलेल्या हॉटेल्स आणि ढाब्यांमध्ये बनावट दारू विक्री खुलेआम सुरू आहे. दर महिन्याला भरगच्च हप्ता दिला जात असल्यामुळे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करत असल्याच्या चर्चा परिसरात सुरू आहेत. सायंकाळच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत महामार्गावरून भरधाव वाहने चालविल्याने अपघातांची संख्याही वाढली आहे. पोलिसांकडून केवळ थातूरमातूर कारवाई केली जाते. या कारवाईत हॉटेलच्या आडोशाला एक दारू विक्री करताना आढळून आला आणि तीन ते चार हजारांचा मुद्देमाल सापडला, असे नमूद करून वेटर किंवा कामगारांवर कारवाई करण्यात येते. त्यामुळे मूळ हॉटेल मालक मोकाट सुटतो. केवळ कारवाईचा देखावा केला जातो, असा नागरिकांचा आरोप आहे.
शाळा परिसरातील स्टेशनरी दुकाने, किराणा मालाची दुकाने तसेच पानटपऱ्यांवर गुटखा, मावा आणि इतर नशीले पदार्थ सहज उपलब्ध होत असून, अनेक तरुण व्यसनाधीन झाले आहेत. त्यामुळे पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने पाबळ परिसरातील या अवैध धंद्यांचे कायमस्वरूपी समूळ उच्चाटन करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

साहेबांकडे यादी असते, तरी कुणावरही कारवाई करत नाहीत
‘‘आमच्यावर काहीच कारवाई होऊ शकत नाही, आमचं कोणी वाकडं करू शकत नाही. आमच्या वरपर्यंत ओळखी आहेत. अधिकाऱ्यांकडे यादी असते, ते कुणावरही कारवाई करत नाहीत. त्यामुळे आमच्या नादाला लागू नकोस,’’ असे म्हणत काही ढाबाचालक आणि अवैध धंदे करणारे खुलेआम धमक्या देत असल्याने सामान्य नागरिक तक्रार करायला धजावत नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com