अपूर्ण सुविधा, रखडलेले कामांचे ग्रहण सुटेना

अपूर्ण सुविधा, रखडलेले कामांचे ग्रहण सुटेना

Published on

कवठे येमाई, ता. १३ : मलठण (ता. शिरूर) येथील ग्रामीण रुग्णालयास गेल्या पाच वर्षांपासून अपूर्ण सोयीसुविधा व रखडलेल्या कामकाजांच्या समस्यांचे ग्रहण लागले आहे. यामुळे नागरिक पुरेशा आरोग्य सेवेपासून वंचित आहेत. रुग्णांना मोठ्या उपचारांसाठी खासगी रुग्णालयांची दारे ठोठावी लागत आहेत. यामुळे रुग्णालयाची स्थिती ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशीच झाली आहे.

सद्यःस्थितीत सकाळी नऊ ते चार या वेळेत बाह्यरुग्ण विभाग सुरू असतो. रुग्णांना शस्त्रक्रिया वा तातडीच्या उपचारांसाठी मंचर, शिरूर, शिक्रापूर, नारायणगाव किंवा थेट पुण्याला धाव घ्यावी लागत आहे. ग्रामीण रुग्णालयाचे काम आठ कोटी २५ लाख ९२ हजार रुपये खर्च करून दोन टप्प्यांत पूर्ण झाल्याचा दावा बांधकाम विभाग करीत असला; तरी रुग्णालय प्रशासनाकडून कामकाज अपूर्ण असल्याचे सांगण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात रुग्णालय व निवासी इमारतीसाठी जवळपास पाच कोटी रुपये खर्च झाले. दुसऱ्या टप्प्यात आणखी तीन कोटी चाळीस लाख रुपये खर्च झाले आहेत. रुग्णालयाच सध्या २४ कर्मचारी कार्यरत आहेत.


अशी आहे दुरवस्था
१. छताला काही ठिकाणी गळती व पोपडे,
२. एक्स-रे रूमची डागडुजी सुरू
३. फरसबंदी खचली
४. शस्त्रक्रिया विभागात भिंतीवरील टाइल्स निखळून पडण्याच्या अवस्थेत
५. पाणीपुरवठा व पीओपीचे काम अपूर्ण
६. निवासस्थानात पाणी, विजेचे काम अर्धवट

गंभीर प्रश्‍नांकडे शासन, लोकप्रतिनिधी पाहणार का?
अपूर्ण कामकाज, प्रशासकीय दिरंगाई व अपुऱ्या सोयीसुविधांमुळे रुग्णालय हे केवळ नावापुरते ठरत असून रुग्णांना इंजेक्शन, गोळ्या, औषधे, मलमपट्टी यांवर समाधान मानत मोठ्या उपचारासाठी खासगी रुग्णालयांची दारे ठोठावी लागत आहेत. शासन व लोकप्रतिनिधी आतातरी या गंभीर प्रश्नाकडे डोळे उघडून पाहणार आहेत का? असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.

‘सकाळ’मुळे आरोग्य यंत्रणेची धावपळ
मलठण रुग्णालयातील दुरवस्थेबाबत ‘सकाळ’मध्ये काही दिवसांपूर्वी बातमी प्रसिद्ध होताच प्रशासनाला जाग आली. जिल्हास्तरीय वैद्यकीय समितीने तत्काळ रुग्णालयात हजेरी लावून रुग्णालय प्रशासनाला खडेबोल सुनावले. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता सूर्यकांत कुंभार यांनी शनिवारी (ता. १३) रुग्णालयाच्या इमारतीची पाहणी करून त्रुटींचा आढावा घेतला व त्रुटींची दुरुस्ती तातडीने करण्यात येईल.

दृष्टीक्षेपातील स्थिती
रुग्णालयात बांधकामासाठी खर्च केलेला निधी
टप्पा क्र. १ : रुग्णालय मुख्य इमारत - ३ कोटी २३ लाख ४६ हजार, निवासस्थाने - १ कोटी ६३ लाख ४० हजार
टप्पा क्र. २ : इमारत - ३ कोटी ३९ लाख ६ हजार
एकूण खर्च - ८ कोटी २५ लाख ९२ हजार

अपूर्ण सुविधा व रखडलेल्या परवानगी
तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी दोन अधिकारी औंध येथे कार्यरत
बांधकाम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र व हस्तांतरण प्रक्रिया अपूर्ण
अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित नाही
शस्त्रक्रिया विभाग काम अपूर्ण व‌ वातानुकूलित यंत्रणा कार्यान्वित नाही.
फर्निचर, संगणक, प्रिंटर इ. आवश्यक साहित्य नाही.

पदांचा तपशील.......मंजूर पदे.......रिक्त पदे
वैद्यकीय अधिक्षक, वर्ग.......१.......१
वैद्यकीय अधिकारी, वर्ग.......२.......३
अधिपरिचारिक.......७.......७
कनिष्ठ लिपिक.......२.......२
सहाय्यक अधीक्षक.......१.......०
औषध निर्माता.......१.......०
क्ष किरण तंत्रज्ञ.......१.......१
प्रयोगशाळा तंत्रज्ञ.......१.......१
प्रयोगशाळा सहायक.......१.......१
कक्षसेवक.......४.......४
सफाईगार.......२.......२
शिपाई.......१.......१
वाहनचालक.......१.......१


सद्यःस्थितीत रुग्णालयात बाह्यरुग्ण विभाग सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत सुरू असून, शेकडो रुग्णांना याचा प्रत्यक्ष लाभ होत आहे. रुग्णालय इमारत व निवासस्थानाचे काही काम अद्याप अपूर्ण आहे. फर्निचर व आवश्यक साहित्याचा अभाव तसेच प्रशासकीय परवानग्या बाकी आहेत.
- डॉ. अतुल नागरे, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, मलठण.

ग्रामीण रुग्णालयात लवकरात लवकर सोईसुविधा उपलब्ध व्हाव्यात व २४ तास रुग्णालय सुरू व्हावे यासाठी माजीमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. तसेच लोकसहभाग व सीएसआर निधीतून रुग्णवाहिका व इतर साहित्य उपलब्ध करून दिले आहे.
- माधुरी थोरात, सरपंच, मलठण.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com