‘हर घर जल’चे नळ कोरडेच
सागर रोकडे : सकाळ वृत्तसेवा
कवठे येमाई, ता. २ : सविंदणे व कान्हूर मेसाई (ता. शिरूर) येथील नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध व मुबलक पाणी मिळावे, यासाठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपयांची सयुक्तिक नळ पाणीपुरवठा योजना २०२२ मध्ये मंजूर झाली. मात्र, मार्च २०२३ पासून सुरू असलेले हे काम विविध अडचणींमुळे व निधीला कात्री लागल्याने अत्यंत संथ गतीने सुरू आहे. परिणामी, या योजनेच्या माध्यमातून शुद्ध पाणी मिळण्यासाठी आणखी किती दिवस वाट पाहावी लागणार, असा सवाल नागरिकांनी उपस्थित करीत रखडलेल्या कामाबाबत संताप व्यक्त केला आहे.
या योजनेचे काम २० मार्च २०२३ रोजी सुरू झाले. शासनाकडून निधी वेळेत उपलब्ध न झाल्याने योजना पूर्णत्वास जाण्यासाठी उशीर झाल्याचे ठेकेदाराकडून सांगण्यात येत आहे. तर प्रशासनाकडून ७५ टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा करण्यात येत असला, तरी प्रत्यक्षात ५० टक्केही काम पूर्ण झाले नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायत अधिकारी व सदस्यांनाही योजनेच्या सद्यःस्थितीची पुरेशी माहिती नसल्याचे दिसून येत आहे. सविंदणे गावातील गावठाण व काही वाड्यावस्त्या व्यतिरिक्त इतर भागात ग्रामपंचायत नळयोजना कार्यान्वित नाही. विहिरींना मुबलक पाणी असल्याने व डिंभे धरणाच्या कालव्याचे आवर्तन येत असल्याने येथे पाणीटंचाई तीव्र स्वरूपात जाणवत नसली, तरी कान्हूर मेसाई गावाची स्थिती मात्र गंभीर आहे. गावाजवळून डिंभा धरणाचा कालवा जात असला, तरी डोंगराळ भूभाग व चढ-उतारामुळे शेती व पिण्यासाठी हक्काचे पाणी अद्याप मिळालेले नाही. उन्हाळ्यात या गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागते. टंचाईच्या काळात मिळेल त्या पाण्याचा वापर करावा लागतो. अनेक वेळा या पाण्यातील टीडीएसचे प्रमाण अधिक असल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. हक्काच्या पाण्यासाठी आंदोलन, उपोषणे, मंत्रालयीन बैठका होऊनही अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. ‘हर घर जल’ योजनेतून दिलासा मिळेल, अशी अपेक्षा असतानाच या योजनेचे काम प्रत्यक्षात अडथळ्यांची शर्यत खेळत असल्याचे चित्र आहे. ग्रामस्थांच्या मते, या योजनेला पूर्णत्वास जाण्यासाठी अजून दीड ते दोन वर्षांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे यंदाही कान्हूर मेसाईकरांना उन्हाळ्यात टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागणार असल्याचे दिसत आहे.
दृष्टिक्षेपात स्थिती
कवठे येमाई येथील घोडनदी वरील फत्तेश्वर बंधाऱ्यावरून पाण्याची सोय
जॅकवेल व पंप हाउसचे काम अंतिम टप्प्यात
शुद्धीकरण प्रकल्प व पाण्याच्या टाक्यांचे काम संथगतीने सुरू
सविंदणे व कान्हूर मेसाईतील बहुतांश वस्त्यांवर पाइपलाइन अपूर्ण
कवठे येमाई हद्दीत ४०० मीटर पाइपलाइनला स्थानिकांचा विरोध
प्रशासनाचा ७५ टक्के काम पूर्ण झाले असल्याचा दावा
ग्रामस्थांचे म्हणण्यानुसार ५० टक्के पेक्षा काम अपूर्ण
निधीअभावी काम रखडल्याची ठेकेदाराची माहिती
योजना स्वरूप
नाव : कान्हूर मेसाई व सविंदणे नळ पाणीपुरवठा योजना
ठेकेदार : सुनील व्ही. चव्हाण
योजनेची किंमत : २४.६१ कोटी रुपये
निविदेची किंमत : १२.२६ कोटी रुपये
वर्क ऑर्डर : ६ डिसेंबर २०२२
कामास सुरुवात : २० मार्च २०२३
पूर्णत्वाची मुदत : ३० महिने
व्यवस्था
जलशुद्धीकरण प्रकल्प क्षमता : २.५ दशलक्ष लिटर
एचडीपी पाईप व्यास : ७५ ते २०० मिमी
एकूण पाइपलाइन लांबी : ६९,८७३ मीटर
योजनेची सद्यःस्थिती
कामाची प्रगती : ७५ टक्के (प्रशासनाचा दावा)
निधी वापर : १५.८७ कोटी
पूर्णत्वासाठी लागणारा कालावधी : ६ महिने (प्रस्तावित)
पाणीसाठा क्षमता : ६ लाख ६३ हजार लिटर
ठेकेदाराची, प्रशासन जबाबदारी व हस्तांतरण
योजना कार्यान्वित झाल्यानंतर सुरुवातीचे तीन महिने ठेकेदार स्वतःच्या खर्चाने, तर पुढील नऊ महिने ग्रामपंचायतीसोबत समन्वयाने जबाबदारी पार पाडणार आहे. सर्व ठिकाणी योग्य दाबाने पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतरच योजना ग्रामपंचायतीच्या ताब्यात दिली जाणार आहे.
कान्हूर मेसाई व सविंदणे या दोन गावांसाठी जलजीवन मिशनअंतर्गत सयुक्तिक नळपाणी पुरवठा योजनेचे काम सुरू आहे. ४०० मीटर पाइपलाइनला स्थानिक नागरिकांचा विरोध व इतर अडचणींमुळे विलंब झाला आहे. सध्या ७५ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित कामासाठी सुमारे सहा महिने लागू शकतात. त्यासाठी मुदतवाढीचा प्रस्ताव सादर केला आहे. वेळोवेळी कामाची पाहणी करून ठेकेदाराला सूचना दिल्या जात आहेत.
- कीर्तिकुमार गुरव, उपअभियंता, जलजीवन मिशन, पुणे
जल जीवन मिशन योजनेचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. बहुतांश वस्त्यांवर अद्याप पाइपलाइनचे काम झाले नाही. ही योजना लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी ठेकेदार व अधिकारी यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करत आहोत; परंतु कामात सुधारणा नाही. याबाबत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लेखी पत्रही देणार आहोत.
- मनीषा नरवडे, सरपंच, सविंदणे
कान्हूर मेसाई गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी उन्हाळ्यात टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे जलजीवन मिशन कार्यक्रमाच्या माध्यमातून ‘हर घर जल’ योजना लवकरात लवकर पूर्ण होणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून या योजनेचे काम संथगतीने सुरू आहे. शासनाने तातडीने ही योजना पूर्णत्वास जाण्यासाठी ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे.
- आसिया तांबोळी, सरपंच, कान्हूर मेसाई
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

