शिरूर तालुक्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट

शिरूर तालुक्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट

Published on

कवठे येमाई, ता. १९ : शिरूर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील बहुतांश गावांमध्ये अवैध दारूधंदे, गुटखा व अमली पदार्थांची खुलेआम विक्री सुरू असल्याचे उघड वास्तव समोर येत आहे. याकडे पोलिस व राज्य उत्पादन शुल्क विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. दोन दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिस पथकाने तब्बल दोन कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करत मोठी धडक कारवाई केली. या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असले, तरी दुसरीकडे तालुक्यात अनेक ठिकाणी सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर ठोस व सातत्यपूर्ण कारवाई होत नसल्याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे.
नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्यानंतरही बहुतांश वेळा केवळ कामकाजाचा भाग म्हणून किरकोळ कारवाई केली जाते, असा आरोप नागरिकांकडून होत आहे. ‘हॉटेलच्या आडोशाला दारू विक्री’ असे नमूद करून छोट्या स्वरूपात गुन्हे दाखल केले जातात आणि प्रत्यक्षात हॉटेल चालक व अवैध धंदे करणाऱ्यांना अभय दिले जाते, अशीही चर्चा रंगली आहे. त्यामुळे पोलिसांना अवैध दारू, गुटखा व अमली पदार्थांच्या विक्रीची माहितीच नाही की जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. दरम्यान, टाकळी हाजी पोलिस दूरक्षेत्राच्या हद्दीतील कवठे येमाई येथे अवैध दारू विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर रविवारी (ता. १८) पोलिस पथकाने छापा टाकला. हॉटेल साईरामच्या आडोशाला दारू विक्री करणाऱ्यावर कारवाई करत अवघ्या ४८० रुपयांची दारू जप्त केली. याप्रकरणी तुकाराम महादेव आवारे (रा. कवठे येमाई, ता. शिरूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र, या कारवाईनंतरच उलट सुलट चर्चेला अधिक उधाण आले आहे. दरम्यान, अवैध दारूमुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्‌ध्वस्त झाले आहेत. याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कामानिमित्त बाहेर असल्याचे सांगितले त्यामुळे प्रतिक्रिया मिळाली नाही.

कारवाईच्या गंभीरतेबाबत प्रश्‍नचिन्ह
एका व्यक्तीचा दारू पिण्याचा खर्च ५०० ते १००० रुपयांपर्यंत जातो. त्यातच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हॉटेल व ढाब्यांवर जोरदार पार्ट्या रंगत असताना, छाप्यात केवळ ४८० रुपयांचा मुद्देमाल सापडतो, यावरून कारवाईच्या गंभीरतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. जप्त केलेल्या दारूपेक्षा शासकीय वाहनाच्या डिझेलचा खर्चच अधिक झाला असेल, अशी उपरोधिक टिप्पणीही नागरिकांमधून केली जात आहे.अनेकदा कारवाई होणार असल्याचा सुगावा लागताच हॉटेल बंद होतात.

टपऱ्यांवर गुंगीकारक पदार्थ टाकून पान विक्री
चौकाचौकांतील पान टपऱ्यांवर गुंगीकारक पदार्थ टाकून पान विक्री होत असल्याचे चित्र असून, त्यामुळे तरुणांमध्ये व्यसनाधीनता झपाट्याने वाढत आहे. विशेषतः रांजणगाव औद्योगिक वसाहतीत हा प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे बोलले जात आहे. रात्रीच्या वेळी कामगार जागरणासाठी अशा पदार्थांचे सेवन करत असल्याची माहितीही पुढे येत आहे. एकीकडे मोठ्या कारवायांचे कौतुक होत असले, तरी दुसरीकडे तालुक्यात सर्वत्र सुरू असलेले अवैध धंदे रोखण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याची भावना बळावत चालली आहे. त्यामुळे अवैध दारूधंदे खरोखर कमी झाले आहेत की कठोर व सातत्यपूर्ण कारवाई होत नाही? हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com