तरुणास बेदम मारहाणप्रकरणी आळंदीतील एकास सक्तमजुरी
पाईट, ता. ४ : आळंदी (ता. खेड) पोलिस ठाण्याच्या हद्दीत ओव्हरटेक करण्याचे कारणावरून २२ वर्षीय तरुणास बेदम मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या संतोष वासुदेव घुंडरे (वय ३५, रा. आळंदी) या आरोपीस राजगुरुनगर (ता. खेड) येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. एस. सय्यद यांनी सात वर्षे सक्तमजुरी व एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
२१ नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास गोपाळपुरा आळंदी येथे दुचाकीवरून (क्र. एम.एच. १४ जे.के. ६९४४) परमेश्वर पुरुषोत्तम अंभोरे व त्याचा मित्र बाहेरगावाहून घरी येत होते. आळंदी गोपाळपुरा येथे घरी जात असताना त्यांच्या समोर हुंडाई मोटार (क्र. एम.एच. १४ एच.डी. ३९९) रस्त्याचे मध्यभागी उभी होती व त्यासमोर समोरून येणारी चारचाकी वाहने उभी होती. त्यावेळी मोटार सायकलसमोरील वाहनास डाव्या बाजूने ओव्हरटेक करून जात असताना मोटारीतील चालक संतोष घुंडरे याने मोठमोठ्याने अर्वाच्य व घाणेरड्या भाषेत शिव्या दिल्या. याचा जाब विचारल्याने घुंडरे याने जाड लाकडी दांडक्याने परमेश्वर अंभोरे यास डाव्या हात व कानावर, डोक्यावर, दंडावर सात ते आठ वेळा जोरजोराने फटके मारले. या मारहाणीत परमेश्वर याच्या नाकातून व कानातून रक्तस्राव झाला होता. याबाबत त्याचे वडील पुरुषोत्तम अंभोरे यांनी आळंदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. आळंदी पोलिसांनी संतोष घुंडरे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक एन. एस. न्यामने, पोलिस उपनिरीक्षक बी. एम. जोंधळे यांनी याबाबत तपास केला होता.
हा खटला राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. एस. सय्यद यांच्यापुढे सुरू होता. त्याचा निकाल गुरुवारी (ता. ३) दिला.
सरकारी पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी अभियोक्ता मिलिंद पांडकर यांनी ९ साक्षीदार तपासले. जखमी व फिर्यादीची साक्ष महत्त्वपूर्ण झाली. यामध्ये आरोपी संतोष घुंडरे याला सात वर्षे सक्तमजुरी व एक लाख रुपये दंडाची शिक्षा व दंड न भरल्यास एक महिना सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. कोर्ट पैरवी म्हणून महिला पोलिस कॉन्स्टेबल वाय. एस. गावडे- सांडभोर यांनी काम पाहिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.