कुंडेश्वर अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना मदत

कुंडेश्वर अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना मदत

Published on

पाईट, ता. २६ ः कुंडेश्वर (ता. खेड) अपघातातील १२ मृत महिलांपैकी १० मृत महिलांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत जमा झाल्याचे खेडचे तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. उर्वरित मृत सुलाबाई बाळू चोरघे व लक्ष्मीबाई हरिश्चंद्र कोळेकर यांच्या शासकीय मदत निधीचे प्रस्तावाचे काम प्रगतिपथावर असल्याचेही त्यांनी सांगितले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, येथील कुंडेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या वळणावर सोमवारी (ता. ११) झालेल्या पिकअप अपघातात पापळवाडी येथील सुमारे १२ महिलांचा मृत्यू व २९ महिला जखमी झाल्या होत्या. या दुर्दैवी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीतून मृतांना प्रत्येकी ४ लाखांची मदत तातडीने जाहीर केली होती.
त्याअंतर्गत मंगळवारी (ता. २६) तहसीलदार बेडसे, नायब तहसीलदार राम बीजे, मंडल अधिकारी मनीषा सुतार, ग्राम महसूल अधिकारी प्रतिभा कसबे यांनी पापळवाडी येथील मृत महिलांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच १२ पैकी १० मृत महिलांच्या वारसांच्या बँक खात्यावर प्रत्येकी ४ लाखांची मदत जमा झाल्याची माहिती उपस्थितांना दिली.
यावेळी तहसीलदार यांनी अपघातात जखमी झालेल्या सर्व व्यक्तींच्या उपचाराची जबाबदारी शासनाने घेतली असल्याचे सांगत जखमींवर योग्य आणि परिपूर्ण उपचार होणार असून, यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

मदत जमा झालेल्या वारसांची नावे
शासकीय मदत जमा झालेल्या १० मृत महिलांचे वारसांची नावे पुढीलप्रमाणे- ज्ञानेश्वर गणपत पापळ, काळुराम गणपत पापळ, दत्तू सतू पापळ, कानिफ गेणभाऊ दरेकर, कैलास किसन दरेकर, ज्ञानेश्वर किसन दरेकर, रामदास चोरघे, तानाजी गेणभाऊ चोरघे, संभाजी बळवंत चोरघे, प्रभू भागू सावंत.

नागरिकांकडून समाधान व्यक्त
या घटनेबाबत शासनाची संवेदनशीलता आणि कार्यतत्परता पाहून बाधित कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले. शासनाने दाखवलेली संवेदनशीलता सर्वांना भावली असून, प्रशासनाच्या कार्यतत्परतेबद्दलही नागरिकांनी समाधान व्यक्त केले. हा अपघात अत्यंत दुर्दैवी होता, मात्र शासनाने या परिस्थितीत सर्वतोपरी मदत करण्याची भूमिका घेऊन तत्काळ कार्यवाही सुरू केल्याने मृतांच्या कुटुंबीयांना व इतर बाधितांना मोठा दिलासा मिळाला आहे.

02574

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com