वन्यप्राण्यांची शिकार केल्यास कठोर शिक्षा भोगावी लागणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वन्यप्राण्यांची शिकार केल्यास 
कठोर शिक्षा भोगावी लागणार
वन्यप्राण्यांची शिकार केल्यास कठोर शिक्षा भोगावी लागणार

वन्यप्राण्यांची शिकार केल्यास कठोर शिक्षा भोगावी लागणार

sakal_logo
By

फुलवडे ता. ११, केंद्र सरकारने वन्यजीव कायद्यातील दुरुस्ती विधेयक ८ डिसेंबर २०२२ रोजी संसदेत सादर केले. त्यास संसदेच्या वरिष्ठ सभागृहाने मंजुरी दिली. वन्यजीव कायद्यातील या सुधारणांमुळे यापूर्वी अनुसूची २ व ४मध्ये असलेल्या वन्यजीवांना थेट अनुसूची १मध्ये स्थान दिले आहे. शेकरू, उदमांजर, तरस, साळींदर, रानपिंगळा, घुबड, श्रृंगी घुबड, मुंगसाच्या सर्व प्रजाती, कोल्हा या वन्यप्राण्यांचा वन्यजीव संरक्षण अनुसूची १ मध्ये समावेश करण्यात आला आहे. यामुळे या वन्यप्राण्यांची शिकार केल्यास संबंधितांना कठोर शिक्षा भोगावी लागणार असून शिक्षेच्या तरतुदींमध्येही बदल करत शिक्षेचा कालावधी वाढविण्यात आला आहे. दंडाच्या रकमेतही वाढ करून २५ हजारांच्या दंडाची शिक्षा आता थेट लाखावर करण्यात आली आहे.
महाराष्ट्राचे मानचिन्ह म्हणून शेकरूची ओळख आहे. शेकरू महाराष्ट्र राज्याच्या वनविभागाचे मानचिन्ह आहे. जगातील मोठ्या वृक्ष खारींच्या चार प्रजातींपैकी शेकरू ही महत्त्वाची प्रजाती असून ती फक्त भारतात आढळून येते. शेकरू हा पश्चिम घाटातील निमसदाहरित उंच, सलग व समृद्ध अशा भीमाशंकरच्या जंगलात आढळतो. शेकरू विविध वनस्पतींची फळे, फुले, पाने हे खाद्य म्हणून वापरत असल्याने वृक्ष प्रजातींची विविधता असलेल्या जंगलात मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यामुळेच शेकरूंचे वास्तव्य हे समृद्ध जंगलाचे प्रतीक ठरते. भीमाशंकर अभयारण्यात सध्या २७०० शेकरू आहेत.

‘‘महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरू यापूर्वी अनुसूची क्रमांक २मध्ये होता. मात्र, सुधारणेनंतर त्यास आता अनुसूची १मध्ये स्थान देण्यात आले आहे. यामुळे शेकरूच्या संवर्धनासाठी मदत होणार आहे. या प्राण्याचा संरक्षण दर्जा आता वाढविल्यामुळे वाघ, बिबट्याप्रमाणे त्यालाही स्थान दिले गेले आहे.’’
- वसंत चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी, भीमाशंकर अभयारण्य.