दांगटवाडीतील पाणीप्रश्न मार्गी

दांगटवाडीतील पाणीप्रश्न मार्गी

फुलवडे, ता. २९ : दांगटवाडी (पोखरी, ता. आंबेगाव) याठिकाणी सकाळ रिलीफ फंड, ग्रामपंचायत व लोकसहभागातून छोट्या तळ्याचे खोलीकरण आणि बांधकाम करून विहिरीत रूपांतर झाल्याने ४ लाख १६ हजार ६०६ लिटर पाणी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे येथील २८ कुटुंबांचा पाणीप्रश्न सुटला आहे. या कुटुंबांची उन्हाळ्यात पाण्यासाठी होणारी वणवण थांबली आहे.
डिंभे धरण पाणलोट क्षेत्रातील या भागात उन्हाळ्यातील काही महिने पाण्याची समस्या निर्माण होत होती. येथील नागरिकांना पाण्यासाठी डोंगर उतरून पाणवठे शोधत त्यातून पाणी आणावे लागत होते. थोड्याफार प्रमाणात पाणी असल्याने ते गाळयुक्त मिळायचे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण व्हायचा. दरवर्षी पाण्यासाठी होणारी ही परवड थांबावी.
या उद्देशाने सरपंच हनुमंत बेंढारी, माजी सरपंच नामदेव दांगट, वनारीनाथ दूध उत्पादक संस्थेचे अध्यक्ष अशोक कोळप, किसन दांगट, मारुती कोळप आणि ग्रामस्थांनी सकाळ रिलीफ फंडाकडे याठिकाणी विहीरीचे खोलीकरण आणि बांधकाम करण्याची मागणी केली होती. त्यानुसार सकाळ रिलीफ फंड, ग्रामपंचायत व लोकसहभागातून २५ फूट बाय ३० फूट विहिरीचे खोलीकरण व बांधकाम झाल्याने ४ लाख १६ हजार ६०६ लिटर पाणी उपलब्ध झाले आहे.


अनेक वर्षांपासून उन्हाळ्यातील काही महिने आम्हाला पाण्यासाठी डोंगर उतरून थोड्याफार प्रमाणात असणाऱ्या पाणवठ्यावरून पाणी आणावे लागत होते. ऐन उन्हाळ्यात अंगाची लाहीलाही होऊन दमछाक होत होती. परंतु यंदा याठिकाणी विहिरीचे काम झाल्याने आमची पाण्यासाठी होणारी वणवण थांबली आहे. सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून हे शक्य झाल्याने आम्ही सर्व ग्रामस्थ सकाळचे आभार मानतो.
- नामदेव दांगट, माजी सरपंच, पोखरी (ता. आंबेगाव)

पोखरी (ता. आंबेगाव) : दांगटवाडीतील विहीर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com