ग्रामस्थ, मंदिर समितीने सहकार्य करावे

ग्रामस्थ, मंदिर समितीने सहकार्य करावे

Published on

भीमाशंकर ता. २४ : ‘‘भीमाशंकर येथे विकास आराखड्याचे काम सुरू असताना स्थानिक ग्रामस्थ आणि मंदिर व्यवस्थापन समितीने सहकार्य करावे.’’ असे आवाहन पोलिस प्रशासनाच्या वतीने मंगळवारी (ता. २३) आंबेगाव-जुन्नरचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केल्याची माहिती घोडेगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सागर पवार यांनी दिली.
ज्या कालावधीत मंदिर बंद असेल त्या कालावधीत नैमित्तिक पूजे व्यतिरिक्त कोणालाही दर्शनाला कोणत्याही मार्गाने सोडू नये. त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमणे आवश्यक आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने सुरक्षा रक्षकांची नेमणूक करून त्यांचे पोलिस व्हेरिफिकेशन करून घ्यावे.
विकास आराखड्या दरम्यान करण्यात येणाऱ्या कामामध्ये दर्शनाची रांग ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी दुकाने लावण्यात येऊ नयेत. ग्रामस्थांनी मंदिर परिसरात काम सुरू असताना आपली अतिक्रमणे काढून घ्यावीत. कोणीही कामात अडथळा निर्माण करणार नाही. आपण त्याबाबत कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा.
संबंधित ठेकेदाराने त्यांच्या कामगारांची यादी त्यांच्या वाहन क्रमांकासह पोलिस ठाण्याला द्यावी. तसेच संबंधित कामगारांना ओळखपत्र द्यावे. साहित्य ज्या ठिकाणी ठेवले आहे त्याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यावेत. सुरक्षा साधनसामुग्री आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात.
मंदिराच्या जवळ राहणाऱ्या स्थानिक ग्रामस्थांनी आपल्या वाहनांचे क्रमांक पोलिस ठाण्याला द्यावेत. जेणेकरून ग्रामस्थांची वाहने सोडताना अडचण निर्माण होणार नाही. भीमाशंकर मंदिर परिसराची भौगोलिक परिस्थिती पाहता याठिकाणी नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने कायमस्वरूपी उपाययोजना आणि यंत्रसामग्री उपलब्ध करून ठेवावी. पोलिस प्रशासनाला कामाकरिता इमारत आणि विश्रामगृह उपलब्ध करून द्यावे. विकास आराखड्याचे काम सुरू असताना येणाऱ्या यंत्रसामग्रीला कोठेही अडथळा होणार नाही. यासाठी सर्वांनी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. या सूचना पोलिस प्रशासनाच्या वतीने बैठकीत मांडल्याचे पवार यांनी सांगितले.

Marathi News Esakal
www.esakal.com