फुलवडेत बीएसएनएल "नॉट कनेक्टिंग''''
फुलवडे, ता. १७ : आंबेगाव तालुक्यातील दुर्गम फुलवडे परिसरात गेल्या आठ दिवसांपासून बीएसएनएलची भ्रमणध्वनी सेवा पूर्णपणे खंडित झाली आहे. यामुळे स्थानिक ग्रामस्थ, व्यावसायिक आणि नोकरदारांचे हाल होत असून, ही सेवा तातडीने पूर्ववत करण्याची मागणी होत आहे.
फुलवडे हे डोंगराळ भागातील गाव असून येथे केवळ बीएसएनएलचेच नेटवर्क उपलब्ध आहे. मात्र, ही सेवा वारंवार खंडित होत असल्याने ग्रामपंचायत, आरोग्य उपकेंद्र, टपाल कार्यालय, पतसंस्था आणि रेशन दुकानातील ऑनलाइन कामांचा खोळंबा होत आहे. गावात तीन जिल्हा परिषद शाळा, एक उच्च माध्यमिक विद्यालय आणि एक अनुदानित आश्रमशाळा आहे. आदिवासी विकास विभागाने आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांसाठी आधार संलग्न बायोमेट्रिक हजेरी (एई-बीएएस) बंधनकारक केली असून, ती थेट वेतनाशी जोडली आहे. नेटवर्क नसल्याने कर्मचाऱ्यांची हजेरी नोंदवण्यात मोठी अडचण निर्माण झाली असून, त्यांच्या वेतनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
बीएसएनएलने आपल्या सेवेत तातडीने सुधारणा करावी, अन्यथा या भागात इतर खासगी कंपन्यांना नेटवर्क उपलब्ध करून देण्याची परवानगी द्यावी, अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
4934

