दुर्गम भागातील विकास ‘व्हेंटिलेटरवर’
फुलवडे, ता. १९ ः जुन्नर व आंबेगाव तालुक्यांच्या सीमेवर वसलेले खेतेपठार हे गाव आहे. निसर्गाने समृद्ध, पण मूलभूत सुविधांपासून वंचित असलेले एक दुर्गम गाव. या ठिकाणी राहणाऱ्या आदिवासी बांधवांना रस्ते, पाणी, आरोग्य या मूलभूत सुविधा मिळत नाही. त्यामुळे त्यांचे जीवन आजही संघर्षाने भरलेले आहे.
सोमवारी (ता. १६) आदित्य विकास घनकुटे (वय २) या चिमुकल्याला दुपारच्या वेळी जेवण करताना अचानक त्रास झाल्याने त्याला उपचारासाठी दवाखान्यात नेण्यासाठी कुटुंबाला भर उन्हात चार ते पाच किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागला. अखेर दोन-तीन तासांनी घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पोहोचल्यावर तो चिमुकला मृत असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. केवळ रस्ता नसल्याने चिमुकल्याला उपचार मिळण्यास विलंब झाला आणि त्या निष्पाप चिमुकल्याचा मृत्यू झाला.
खेतेपठार हे गाव जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यांच्या सरहद्दीवर आहे. गंगापूर खुर्द, अमोंडी, वैष्णवधाम, पारुंडे या ग्रामपंचायतींच्या हद्दीत खेतेपठाराचा वेगवेगळा भाग विभागलेला आहे. अमोंडी व गंगापूर खुर्द येथून खेतेपठारावर जाण्यासाठी आजही पाऊलवाटेने साधारण एक तास डोंगर चढावा लागतो. वैष्णवधाम (ठाकरवाडी) येथून एक कच्चा रस्ता आहे, पण मुरूम आणि मातीचा हा नागमोडी रस्ता मागील पावसाळ्यात पूर्णपणे वाहून गेलेला आहे.
खेतेपठार येथील वाड्या- वस्त्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी यापूर्वी काही संस्थांनी खडकात तळी, टाक्या खोदलेल्या आहेत. त्यांची साफसफाई, खोलीकरण व कठडा बांधकाम करून त्यातून प्रत्येक वाडीस नळाद्वारे पाणीपुरवठा करणे शक्य आहे. त्यादृष्टीने कार्यवाही झाली तर पाण्याचा प्रश्न मार्गी लागू शकतो.
...अन्यथा अशा घटना पुन्हा घडतील
आज आदित्य गेला पण त्याच्या जाण्याने अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. खेतेपठारसारख्या दुर्गम भागात रस्ते, पाणी व आरोग्य या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही केवळ गरज नाही, तर प्रशासनाची जबाबदारी आहे. अन्यथा अशा घटना पुन्हा- पुन्हा घडत राहतील आणि निरागस जीवांचा बळी जात राहील.
खेतेपठारचा विभागलेला भाग
वस्तीचे नाव - ग्रामपंचायत - तालुका
साबळेवाडी- गंगापूर- आंबेगाव.
करवंदेवाडी- अमोंडी- आंबेगाव.
तांबटमाळ- गंगापूर- आंबेगाव.
तांबटमाळ- अमोंडी- आंबेगाव.
घनकुटेवस्ती- वैष्णवधाम- जुन्नर.
इष्टेवाडी- वैष्णवधाम- जुन्नर.
बांबळेवाडी- पारुंडे- जुन्नर.
गव्हाळा- पारुंडे- जुन्नर.
खेतेपठार येथे जाण्यासाठी वैष्णवधाम (ठाकरवाडी) येथील कच्च्या रस्त्यासाठी तत्काळ निधी मंजूर करण्यात यावा किंवा इतर पर्यायी मार्गाने सुरक्षित रस्ता तयार करण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा.
- सीताराम जोशी, संस्थापक-संचालक, आदिवासी समाज कृती समिती, महाराष्ट्र राज्य.
आदिवासी विकास निरीक्षक यांनी खेतेपठार येथे जाऊन तपासणी केलेली आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर आम्ही रस्ता तयार करण्याच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद यांच्याशी पत्रव्यवहार करून तत्काळ कार्यवाही करणार आहोत.
- प्रदीप देसाई, प्रकल्प अधिकारी, ए.आ.वि.वि. घोडेगाव
खेतेपठार ते आपटी रस्ता प्रधानमंत्री ग्राम सडक योजना व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या मार्फत मंजूर असून, निधी नसल्याने काम अपूर्ण आहे.
- प्रमिला वाळुंज, गटविकास अधिकारी आंबेगाव.
खेतेपठार रस्ता वनविभागाच्या हद्दीतून जात असल्याने १३ डिसेंबर २०२५ रोजी वनविभागाने संयुक्त पाहणी करून सार्वजनिक बांधकाम विभागाला १७ मुद्यांची पूर्तता करण्यास सांगितले होते. आजअखेर त्यांनी सहा मुद्द्यांची पूर्तता केली आहे. अजून ११ मुद्द्यांची पूर्तता बाकी आहे. ती आल्यावर वनविभागाकडून परवानगीसाठी कार्यवाही केली जाईल.
- कुणाल लिमकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, घोडेगाव.
05037, 05038
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

