चाकण-भोसरी कोंडीबाबत स्वतंत्र बैठक मुख्यमंत्र्यांचे आश्वासन; गृहनिर्माण सोसायटी पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट
पीतांबर लोहार ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : पुणे-नाशिक आणि तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. ती सोडविण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी गृहनिर्माण सोसायटी पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. त्यावर स्वतंत्र बैठक घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
पिंपरी-चिंचवडप्रमाणेच लगतच्या चाकण, महाळुंगे, तळेगाव दाभाडे, मरकळ परिसरात मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्र विकसित झाले आहे. त्यामुळे ट्रक, कंटेनर अशा अवजड वाहनांची सतत वर्दळ असते. शिवाय, नागरी क्षेत्र वाढल्याने खासगी वाहने व कामगारांसाठी कंपन्यांच्या बसची संख्याही वाढली आहे. तसेच, प्रवाशांना थेट सेवा देण्यासाठी राज्याच्या विविध भागातून येणाऱ्या खासगी प्रवासी बसही या भागात वाढल्या आहेत. तुलनेने रस्ते अरुंद आहेत. पुणे-नाशिक महामार्ग व तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाचे रुंदीकरण रखडले आहे. शिवाय, बेशिस्त वाहनचालकांमुळे वारंवार वाहतूक कोंडी होते. त्यातून मार्ग काढण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी चिखली-मोशी हाउसिंग फेडरेशनच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी फेडरेशनचे नेतृत्व केले.
‘सकाळ’ ही करतोय पाठपुरावा
पुणे-नाशिक महामार्गासह तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी, त्याची कारणे आणि काय उपाययोजना करायला हव्यात, याकडे ‘सकाळ’ने वेळोवेळी लक्ष वेधले आहे.
सद्य:स्थिती...
तळेगाव- शिक्रापूर महामार्ग रुंदीकरणासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. नाशिक फाटा कासारवाडी ते राजगुरुनगर (खेड) पर्यंत नाशिक महामार्ग उन्नत (एलिव्हेटेड) करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी नाशिक फाटा ते मोशीतील इंद्रायणी नदी पुलापर्यंत दोन्ही बाजूचे बाधित होणारी बांधकामे महापालिकेने हटविली आहेत. आता महामार्ग रुंदीकरण व उन्नत करण्याच्या कार्यवाहीची गरज आहे.
‘‘हिंजवडीप्रमाणेच चाकण, म्हाळुंगे एमआयडीसी, पुणे-नाशिक महामार्गावर भोसरी-मोशी परिसरात मोठी वाहतूक कोंडी होते, ती सोडविण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. त्यावर स्वतंत्र बैठक घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.’
- संजीवन सांगळे, अध्यक्ष, चिखली-मोशी हाउसिंग फेडरेशन
‘‘पिंपरी-चिंचवड शहराच्या एका बाजूला हिंजवडी आणि दुसऱ्या बाजूला भोसरी, चाकण औद्योगिक परिसर आहे. वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन्ही ठिकाणी गंभीर आहे. आता हिंजवडीचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्याच पद्धतीने चाकणचा प्रश्न सोडवावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली आहे.’
- महेश लांडगे, आमदार, भोसरी
चौकट
--------------
पुणे-नाशिक महामार्गावर गुडविल चौक, भोसरीतील आळंदी चौक, सद्गुरूनगर चौक, राजा शिवछत्रपती चौक, मोशी गावठाण, भारतमाता चौक, चाकण चौक या भागात आणि तळेगाव- शिक्रापूर महामार्गावर अनेक ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी होते. त्यातून मार्ग काढण्यासाठी काय उपाययोजना करायला हव्यात, आपल्याला काय वाटते, याबाबत आपले म्हणणे pimpritoday@esakal.com आणि ७७२१९७४४४७ या व्हाटसॲप क्रमांकावर पाठवा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.