पिंपरी प्रभाग लेखाजोखा ४

पिंपरी प्रभाग लेखाजोखा ४

Published on

प्रभागांचा लेखाजोखा ः ४
---
प्रभाग क्रमांक ४ : दिघी-बोपखेल
---
शिस्तीचे दुर्भिक्ष; ‘राजकीय’ दुर्लक्ष

दिघीत रस्त्यावर मंडई; बोपखेलमध्ये अरुंद गल्ल्या अन् कोंडी

पिंपरी, ता. १५ ः सर्व बाजूने लष्करी आस्थापनांनी वेढलेली गावे म्हणजे दिघी आणि बोपखेल. या गावांचा मिळून प्रभाग चार आहे. मुख्य रस्त्यावर भरणारी मंडई, अरुंद गल्ल्या, रेडझोनमधील अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे, मोकाट जनावरांचा रस्त्यावर वावर, रस्त्याच्या कडेलाच वेडीवाकडी बेशिस्तपणे उभी केली जाणारी वाहने अशी स्थिती आहे दिघी गावाची. बोपखेलगाव विधानसभेला पिंपरी मतदारसंघात आहे, तर महापालिका प्रभाग म्हणून भोसरी मतदारसंघात आहे. त्यामुळे सुविधांच्या बाबतीत काही अंशी दुर्लक्ष होत आहे. शिवाय, नवीन रस्त्याचे संथगतीने सुरू असलेले काम, गणेशनगर व रामनगरसह गावठाणातील अरुंद रस्ते, रस्त्याच्या कडेला टाकला जाणारा कचरा, अशा अडचणी बोपखेलमध्ये आहेत.
आळंदी-पुणे-पंढरपूर पालखी मार्ग दिघी गावातून जातो. महापालिकेने मार्गाचे रुंदीकरण केले आहे. चोविसावाडी काटे कॉलनीपासून दिघी दत्तनगरपर्यंत बीआरटी मार्ग आहे. दत्तनगरपासून गावठाण पीएमपी बसथांब्यापर्यंत चौपदरी मार्ग असून, मध्ये दुभाजक आहे. गावठाणापासून टाटा टेलिकम्युनिकेशन सेंटरपर्यंत दुहेरी मार्ग आहे. परंतु, दुभाजक नसल्याने अपघाताची शक्यता आहे. याच दरम्यान फळे, भाजीपाला व विविध वस्तू विक्रेत्यांनी दुकाने थाटलेली असतात. अंतर्गत भागात अनेक कॉलन्या आहेत. मात्र, रस्ते अतिशय अरुंद आहेत, शिवाय काही ठिकाणी खड्डे आहेत. रस्त्यांवर सांडपाणी असते.
बोपखेलमध्ये जाण्यासाठी पूर्वी दापोडीतून रस्ता होता. लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाने (सीएमई) २०१५ पासून तो सार्वजनिक रहदारीसाठी बंद केला होता. त्यामुळे बोपखेलमधून दापोडीत येण्यासाठी दिघी-भोसरी-नाशिक फाटा कासारवाडी-फुगेवाडी मार्गे किंवा पालखी मार्गावरील बोपखेल फाटा-कळस-विश्रांतवाडी-खडकी बाजार-बोपोडी या मार्गे जावे लागत होते. हे अंतर सुमारे १२ ते १५ किलोमीटर होते. त्यामुळे बोपखेल व खडकी बाजार यांना जोडण्यासाठी मुळा नदीवर पूल उभारण्यात आला. आता वाहतुकीसाठी पूल खुला आहे. परंतु, तीन मीटरपेक्षा अधिक उंचीच्या वाहनांना प्रवेश बंदी आहे. परिणामी, मोठी वाहने, पीएमपी बस, स्कूलबस पुलावरून जाऊ शकत नाहीत. त्यांना पूर्वीच्याच मार्गाने ये-जा करावी लागत आहे. प्रवाशांचा वेळ आणि पैसा अधिक खर्च होत आहे.

बोपखेलचा राजकीय गुंता
तीन बाजूने लष्करी आस्थापना आणि एका बाजूला मुळा नदी यामुळे बोपखेलगाव एखाद्या बेटासारखे आहे. गावाचा समावेश मावळ लोकसभा व पिंपरी विधानसभा मतदारसंघात आहे. खासदार-आमदारांच्या दृष्टीने दुर्लक्षित आहे. महापालिका प्रभाग रचनेचा विचार केल्यास शिरूर लोकसभा व भोसरी विधानसभा मतदारसंघातील दिघी गावाला जोडून आहे. त्यामुळे प्रभागाचे नेतृत्व करणाऱ्या नगरसेवक, नगरसेविकांना दोन खासदार, दोन आमदारांशी समन्वय साधावा लागत आहे. त्यातही एकाच पक्षाचे असले तर सोईचे अन्यथा दुर्लक्षित अशी स्थिती आहे. शिवाय, बोपखेलमधील गणेशनगरचा अर्धा भाग पिंपरी-चिंचवड महापालिकेत तर काही भाग पुणे महापालिकेतील कळस गावात आहे.
त्यामुळे मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूचे राजकीय नेतृत्व वेगवेगळे आहे. बोपखेल म्हणजे राजकीय दृष्ट्या एक गुंता बनला आहे.

प्रमुख समस्या
- रस्ते ः दिघीतील अंतर्गत कॉलन्या, चाळी व बोपखेल गणेशनगरमधील सर्व गल्ल्या अतिशय अरुंद आहेत. गणेशनगर मुख्य रस्ताही खूपच अरुंद आहे.
- अतिक्रमणे ः दिघीतील पालखी मार्गाच्या पदपथासह अंतर्गत मोठ्या रस्त्यांवर अतिक्रमणे आहेत. दत्तनगर येथे बीआरटी मार्गाच्या प्रारंभीच दररोज मंडई भरते
- अनधिकृत बांधकामे ः गुंठा-अर्ध्या गुंठ्यात बांधकामे झाली आहेत, भारतमाता नगर, गजानन महाराजनगर, मॅगझीन चौक परिसर रेडझोनमध्ये आहे

- खड्डे, खडी ः दिघीतील अंतर्गत रस्ते विविध वाहिन्या टाकण्यासाठी खोदलेले आढळले. मात्र, काम झाल्यानंतर चर व्यवस्थित बुजवलेले नाहीत. परिणामी, खड्डे पडून खडी पसरते. बोपखेल व खडकी बाजार जोडण्यासाठी उभारलेल्या उड्डाणपुलाला जोडण्यासाठीच्या रस्त्याचे काम अर्धवट आहे
- रात्री पाणीपुरवठा ः दिघी व बोपखेल परिसरातील सर्वच भागात दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, काही भागात रात्री पाणी सोडल्या जात असल्याने नागरिकांना जागरण करावे लागते
- रस्त्यांवर वाहने ः पालखी मार्गाच्या दोन्ही बाजूंसह दिघी व बोपखेलमधील मुख्य रस्त्यांच्या कडेलाच वाहने उभी केली जातात, त्यांचा काही भाग रस्त्यावर येऊन अडथळा ठरतात

कुठे? काय?
- दिघी दत्तनगर परिसरात पालखी मार्गावर मंडई
- अंतर्गत गल्ल्या खूपच अरुंद असल्याने आपत्कालीन वाहने घटनास्थळी पोहोचणे मुश्कील
- बोपखेल रामनगरजवळील नाल्यालगत रस्त्यावरच कचरा टाकलेला
- गणेशनगर परिसरात मुख्य रस्त्यावरील गतिरोधकाचा काही भाग उखडून मोठा खड्डा पडला आहे. त्यात सांडपाणी साचते
- रामनगरमधील गल्ल्या अतिशय अरुंद, कचरा संकलन गाडी घराघरांपर्यंत पोहोचणे मुश्कील

चतुःसीमा
उत्तरेला दिघी मॅगझीन कॉर्नरपासून बनाच्या ओढ्यापर्यंत भोसरी रस्ता; दक्षिणेला मुळा नदी, कळसगाव. मधल्या टप्प्यात लष्करी आस्थापनांमुळे प्रभाग खंडित. फक्त बोपखेल फाटा रस्त्याने कनेक्टिव्हिटी. पूर्वेला लष्कराचा दारूगोळा सराव मैदान, दत्तगड आणि पश्चिमेला सीएमई परिसर व काही प्रमाणात भोसरीचा भाग.

समाविष्ट भाग
दिघी व बोपखेल गावठाण, दत्तनगर, मॅगझीन कॉर्नर, संत गजानन महाराज नगर, भारतमातानगर, सैनिक कॉलनी, परांडेनगर, सावतानगर, गणेशनगर, रामनगर

असे आहेत मतदार
पुरुष ः २७,५३३
महिला ः २४,९६५
तृतीयपंथी ः ५
मतदार ः ५२,५०३
....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com