बिबट्याकडून आणखी एक बळी
पिंपळवंडी, ता. ९ : पिंपरी पेंढार (ता. जुन्नर) येथील डेरे मळ्यात बुधवारी (ता. ९) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात सुजाता रवींद्र डेरे (वय ४०) या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.
सुजाता डेरे या सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घराच्या समोर लघुशंकेला गेल्या असता पाठीमागून आलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. त्यांच्या ओरडण्याचा आवाज त्यांचे पती रवींद्र डेरे यांना आला असता ते लगेच घराबाहेर आले. तोपर्यंत बिबट्या सुजाता यांना जबड्यात धरून घरापासून १०० फुटांपर्यंत ओढत घेऊन गेला. रवींद्र डेरे यांनी बिबट्याच्या तावडीतून सुजाता यांना सोडविण्याचा प्रयत्न केला. बांबूच्या साहाय्याने ते बिबट्याचा प्रतिकार करत होते. बिबट्याने सुजाता यांना जबड्यातून सोडले व तो बाजूला असलेल्या उसाच्या शेतात निघून गेला. सुजाता यांच्या डोक्याला व मानेला गंभीर दुखापत झाली होती. प्रचंड प्रमाणात रक्तस्राव सुरु होता. यातच त्यांचा जागेवर मृत्यू झाला.
या घटनेची माहिती वनविभागाला कळविल्यानंतर जुन्नर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण व वनविभागाची टीम, ओतूर पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर उपवनसंरक्षक अमोल सातपुते हे देखील घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी घटनेची माहिती घेतली. वनविभागाच्या वतीने पंचनामा करून सुजाता डेरे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी आळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला.
सुजाता डेरे यांच्या मृत्युमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच, नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया देखील येत आहेत.
घटना घडण्यापूर्वी या परिसरात दररोज बिबट्याचे दर्शन डेरे यांना होत होते. तसेच, त्यांनी वनविभागाला या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी देखील केली होती. डेरे यांच्या घराच्या बाजूलाच गोठा असून, बिबट्या अनेकदा त्याठिकाणी येत असे. वनविभागाला पिंजरा लावण्याची वारंवार मागणी करून देखील त्याठिकाणी पिंजरा न लावल्याने ही घटना घडली असल्याचे डेरे व ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
आमदार अतुल बेनके, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी घटनास्थळी येऊन पीडित कुटुंबाची भेट घेतली.
परिसरातील दुसरी घटना
याच परिसरात काही महिन्यांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात बाजरीची राखण करत असलेल्या महिलेचा मृत्यू झाला होता. तसेच, दोन दिवसांपूर्वी एक महिला बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेली होती. गेल्या चार महिन्यांत पिंपरी पेंढार, पिंपळवंडी व उंब्रज या परिसरातील २० बिबटे वनविभागाने जेरबंद केले होते. असे असताना देखील या परिसरातील बिबट्यांची संख्या कमी होत नाही. आज याच परिसरात तीन बिबट्यांचे नागरिकांना दर्शन झाले होते.
सदर घडलेली घटना ही दुर्दैवी असून, या परिसरात ४० पिंजरे लावण्यात येतील. येथील बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तैनात केलेले आहेत. थर्मल ड्रोनच्या साहाय्याने बिबट्याचा मागोवा घेण्याचे काम वनकर्मचारी करत आहेत. वनविभागाने सांगितलेल्या सूचनांचे पालन नागरिकांनी करणे गरजेचे आहे.
- अमोल सातपुते, उपवनसंरक्षक
घडलेली घटना हि खूप दुःखद आहे. तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने मी तालुक्यातील ग्रामस्थांना आवाहन करतो की आपल्याला ही स्थिती गांभीर्याने घ्यावी लागणार आहे. सरसकट बिबटे पकडण्याची मागणी आपण केली होती. पकडलेले बिबटे कुठे ठेवायचे? हा वनविभागासमोर प्रश्न आहे. तालुक्यात बिबट्यांची घनता वाढलेली आहे. विशेषतः पिंपळवंडी, काळवाडी, उंब्रज व पिंपरी पेंढार या गावात ती संख्या जास्त आहे. तालुक्यातील सगळे बिबटे वनविभागाने पकडावेत. लवकरात लवकर यावर तोडगा काढण्यासाठी मंत्रालयात संबंधित विभागाला भेटून मी प्रश्न मांडणार आहे. बिबटे मानवी वस्तीत नियमित येत असल्याने ते मनुष्यासाठी धोकादायक होत आहेत.
- अतुल बेनके, आमदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

