निरगुडे येथील हनुमान मंदिरावरील शिलालेखांचा उलगडा

निरगुडे येथील हनुमान मंदिरावरील शिलालेखांचा उलगडा

Published on

सिद्धार्थ कसबे ः सकाळ वृत्तसेवा
पिंपळवंडी, ता. १३ : निरगुडे (ता. जुन्नर) येथील हनुमान मंदिरावरील दोन्ही शिलालेख हे मंदिराचा मुख्य गाभारा व बाहेरील सभामंडप बांधकामासंबंधित आहेत. हनुमान मंदिर गाभारा प्रवेशद्वारावरील हा शिलालेख मुख्य गाभारा प्रवेशद्वाराच्या कीर्तिमुख पट्टीवर कोरलेला आहे. हा शिलालेख उठाव स्वरूपाचा असून सहा ओळींचा, देवनागरी लिपीतील शुद्ध संस्कृत भाषेत आहे. शिलालेखाची शिळा गुळगुळीत असून त्यावरील सर्व अक्षरे सुवाच्च, एकसारखी कोरलेली असून ठळकपणे दिसतात. त्यामुळे शिलालेख अक्षरे अगदी सहजपणे वाचता येतात.

या दोन्ही शिलालेखांचे अभ्यासपूर्ण संकलन व विवरण पुण्याचे इतिहास अभ्यासक अनिल दुधाणे, अथर्व पिंगळे यांनी करून जुन्नरमधील हा शेकडो वर्षांपूर्वीचा ठेवा व त्याची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहचवली. याकामी त्यांना डॉ. गिरीश मांडके, डॉ. अमोल पुंडे, यश मस्करे, सौरभ मंडलिक, सिद्धार्थ कसबे, ग्रामस्थ निरगुडे व मंदिर संस्थान कमिटी यांचे सहकार्य लाभले.

शिलालेखाचे वाचन :
- ग्रामाणां त्रितयं पुरातनमिदं मीनापगातीगं वछीसावरसंज्ञकं वटपुरं तत्रा (धिका) रद्व (ये)
-वारूण्यां शिवपर्वतस्य निकटे कालं च कौतीपुरे तस्मिन्केवलमेव ले (खनमनुष्या) स्ते चिरं भूतिदं
- प्राचीनार्जित भूरिपुण्यजनिप्ताद्रुद्रप्रसादादयं जात: सर्व (सुख) (याद) व महादेवः कुले दीपक:
- इत्थं श्रीहनुमत्पदाब्ज भजनप्राप्ताश्रयः श्रीभुजा येनाकारि भुजांर्जितेन वसुना श्रीमारूतेरालयं
- शाके (कारि) नृपैर्मिते प्रभवनामाब्देतपस्ये सिते पक्षे खैदुतिथौ शना (व) दतिभे सौभाग्ययुक्तैतिले
- एवं सर्वसुशोभने कमलिनीनाथे खमध्यस्थिते होरायां शशिजस्य पूर्णमभद्वातात्मजस्यालयं

अर्थ : जुन्नर तालुक्यातील मीना नदीच्या तीरावर तीन गावांचा एक समूह आहे, ती तीन गावे म्हणजे सावरसज्ञक (सावरगाव), वटपूर (वडज गाव), कौंतापूर(काटेडे), अशी आहेत. या गावांच्या पश्चिमेला शिवपर्वता (शिवनेरी) (वारूण्यां म्हणजे येणेरे गावाशेजारी) जवळ वायव्य दिशेला असलेले काले गावाजवळ केवळ लेखनकर्मावर उपजीविका करणारे(अधिकारी) एक घराणे म्हणजे कारकुनी करणारी माणसे जेथे राहतात. या घराण्याने प्राचीन काळापासून कारकुनीचे काम अनेक वर्ष पिढ्या न पिढ्या हे करत आहे. त्यातून त्यांनी हे पुण्य मिळवले आहे. या पुण्यातून त्यांना रुद्र म्हणजे श्री शंकर प्रसन्न होऊन त्यांना महादेव यादव नावाचा कुलदीपक (प्रथम मुलगा) झाला. या घराण्याने श्री हनुमानाच्या पदकमलाच्या भक्तीमुळे म्हणजेच या मंदिराची सातत्याने पूजा केली. यामुळे या महादेव यादवांना या गावात आश्रय मिळालेला आहे. या गावात असलेल्या हनुमंताची त्याने भक्ती व पूजा केलेली आहे. त्यातून ते वैभव भोगत असून त्यांना संपत्ती, धन व पुण्य प्राप्त झाले आहे. या पुण्य आणि संपत्तीच्या जोरावर शके १६६४ प्रभव सवत्सर शुक्ल १० म्हणजेच ३ एप्रिल १७४२ शनिवारी हे देऊळ महादेव यादव याने बांधले.

निरगुडे येथील हनुमान मंदिर मुख्य प्रवेशद्वारावरील शिलालेख. हा शिलालेख हनुमान मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वर गणेश पट्टीवर कोरलेला आहे. हा शिलालेख उठाव स्वरूपाचा असून १२ ओळींचा आहे. देवनागरी लिपीतील शुद्ध मराठी व संस्कृत असा मिश्र भाषेत आहे. शिलालेखाची शिळा फारच ओबडधोबड आहे. त्यावरील एकेक स्वरूपात आहे. शिलालेख अनेक वर्ष उघड्यावर असल्यामुळे काळाच्या ओघात किवा वातावरणामुळे तसेच रंगरंगोटीमुळे लेखावर परिणाम होऊन त्याची अक्षरे पूर्णपणे झिजली असून त्यांचा उठावपणा नाहीसा झालेला आहे. काही तुटून गेलेली आहेत, तर काही सिमेंटमध्ये बुजली आहेत. त्यामुळे अनेक प्रयत्ना अंती शिलालेखाचा खालील भाग वाचता येतो.

शिलालेखाचे वाचन :
- श्रीगजानन श्रीशके
- १६८८ व्यय नाम सव
- छरे मार्गेसर सुध
- १२ भृगू वासरे (अक्षरे नष्ट)(अक्षरे नष्ट) प्रा श्रीराम दूत
- हनुमत प्रताप सीधां मुख्या वतार
- शिव शंकर दीन (अक्षरे नष्ट) कुळदेव
- ता पावन तद (अक्षरे नष्ट) सीध करनिक तो तया
- (अक्षरे नष्ट) तयाचा दवा उपनाम सुळे वृत्ती ग्राम पुरा
- तन कुलकीण छ ताग तरफेत ग्रामे दोनए नीरगु
- डे आणि काकल तिचे कुलकर्णी मातुलींग (महाळुंगी) तरफेत जे गी (अक्षरे नष्ट)
- ह (अक्षरे नष्ट) वनू जे तयाचे (अक्षरे नष्ट) सा तिसरे वडगाव सहाणि तियेचे असति
- जोसी कुलकर्णी ||१||

अर्थ : श्री गजननास नमन: शालिवाहन शकाच्या १६८८ व्या वर्षी व्यय नाम संवत्सरात मार्गेशिष शुद्ध १२ म्हणजेच १३ डिसेंबर १७६६ शनिवारच्या दिवशी रामाचा दूत असलेला हनुमान प्रताप जो शिवाचा अवतार आहे. या ठिकाणी सुळे नामक कुणी कर्णिक (कायस्थ) आहे, त्याला निरगुडे आणि काकले (काले) या दोन गावांची वृत्ती पहिल्यापासून होती. म्हणजेच निरगुडे व काले ही गावे त्यांचाकडे पिढीजात कामाची किवा इनाम दिलेली होती. याच गावाशेजारी असलेली अजून दोन नवीन गावे वडगाव साहनी व म्हाळुंगी त्यास नव्याने इनाम दिली. त्या गावात जोशी आणि कुलकर्णी राहतात, या सुळे नामक कायस्थ ज्यांच्याकडे कुलकर्णी पद आहे, यांनी लेखन वृत्तीच्या जोरावर या मंदिराचा सभामंडप व प्रवेशद्वार बांधिला.

शिलालेखाचे महत्त्व : जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यापासून पाच किलो मीटर अंतरावर मीना नदीच्या तीरावर निरगुडे नावाचे गाव आहे. या गावात महारुद्र हनुमंताचे एक मंदिर आहे. या गावात पूर्वापार लेखन वृत्तीवर काम करणारे यादव घराणे राहत असून वंश परंपरेने ते आपले काम करत आहेत, त्या कामातून त्यांना पुष्कळ, असे पुण्य आणि धन प्राप्त झाले आहे. या धनातून त्या घराण्यातील कुलदीपक महादेव यादव याने या मंदिराचे मुख्य गाभाऱ्याचे बांधकाम केले आहे. पुढे २४ वर्षानंतर याच गावातील सुळे नामक कायस्थ कुलकर्णी तो देखील लेखनवृत्ती कारकुनी करत आहे, याला निरगुडे आणि शिवनेरी जवळील काले नावाचे गाव वृत्ती (इनाम) आहे. पुढे यात वाढ होऊन त्यास अजून वडगाव साहनी आणि म्हाळुंगी ही दोन गावे अजून इनाम मिळाली आहेत की, ज्या गावात जोशी कुलकर्णी राहतात. या गावातील कुलकर्णी म्हणून त्यांना पिढीजात मान्यता होती, अर्थात त्या हुद्द्याचे इनाम होते. या सर्व गावाच्या उत्पनातून त्यांनी हनुमान मंदिराचा सभामंडप व मुख्य प्रवेशद्वार बांधले आहे. लेखन वृत्तीच्या कार्यावर भरपूर पुण्य आणि धन मिळवून त्या धनाचा उपयोग त्यांची मंदिरासारखे एक आध्यात्मिक व धार्मिक केंद्र उभे करून जनसामान्यकरिता सामाजिक व पुण्याचे द्वारे खुली करून एक महत्तम कार्य केले आहे. एखाद्या ठिकाणी स्वतःच्या उत्पनातून मंदिरासारखे बांधकाम करून त्याची महती शिलालेख स्वरूपात कोरून ठेवणे, हे या शिलालेखाचे महत्त्व आहे.


वंश परंपरेने लेखन वृत्तीवर काम करणारे महादेव यादव यांचे घराणे राहत असून त्या कामातून त्यांना पुष्कळ, असे पुण्य आणि धन प्राप्त झाले. या धनातून त्यांनी हनुमान मंदिराचे मुख्य गाभाऱ्याचे बांधकाम केले. पुढे २४ वर्षानंतर त्याच काले गावातील सुळे नामक कायस्थ कुलकर्णी यांना वडगाव साहनी आणि म्हाळुंगी ही दोन गावे अजून इनाम मिळाली. त्या पैशातून त्यांनी हनुमान मंदिराच्या सभामंडपाचे काम पूर्ण केले, लेखन वृत्तीच्या कार्यावर भरपूर पुण्य आणि धन मिळवून त्या धनाचा उपयोग त्यांची मंदिरासारखे एक आध्यात्मिक व धार्मिक केंद्र उभे करून जनसामान्यांकरिता सामाजिक व पुण्याचे द्वारे खुली करून एक महत्तम कार्य केले आहे. यावरून ही घराणी धार्मिक वृत्तीची होती, हे सिद्ध होते.
- अनिल दुधाणे, इतिहास अभ्यासक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com