नाणेघाट शिलालेखाचे संवर्धन काळाची गरज

नाणेघाट शिलालेखाचे संवर्धन काळाची गरज

Published on

सिद्धार्थ कसबे : सकाळ वृत्तसेवा
पिंपळवंडी, ता. १९ : जेम्स प्रिन्सेप हे प्राचीन भारतीय लिपिशास्त्रज्ञ, पुरातत्त्वज्ञ व नाणेशास्त्रज्ञ होते. त्यांच्या कार्यामुळेच सम्राट अशोकाच्या शिलालेखांचे वाचन करण्यात आले आणि भारताचा विस्मरणात गेलेला प्राचीन इतिहास उजेडात आला. जुन्नरमधील नाणेघाटातील शिलालेख हा पश्चिम भारतातील सर्वात मोठा शिलालेख आहे. महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाची गेली दोन हजार वर्षे साक्ष देत उभा हा शिलालेख सध्या नष्ट होण्याच्या मार्गावर येऊन पोचला आहे. या शिलालेखाचे संवर्धन करणे काळाची गरज आहे
जेम्स प्रिन्सेप यांचा जन्म २० ऑगस्ट १७९९ रोजी इंग्लंडमधील इसेक्स येथे झाला आणि मृत्यू २२ एप्रिल १८४० रोजी झाला. ते ब्राह्मी लिपीचे वाचन करणारे पहिले व्यक्ती होते. त्या काळी या लिपी वाचता येत नव्हत्या. त्यांनी हजारो वर्ष मुक्या राहिलेल्या भारताच्या इतिहासातील अपरिचित निःशब्द दगडांना बोलते केले. या शोधामुळे विस्मृतीत गेलेल्या भारतीय इतिहासातील सम्राट अशोकांचा आवाज पुन्हा ऐकू आला. भारतभर पसरलेल्या खडकांवरील आणि स्तंभावरील लेखांमधून त्याचा पुनर्शोध लागला आणि त्यामुळे केवळ बौद्ध धर्माचा अभ्यासच नाही तर संपूर्ण भारतीय पुरातत्त्वशास्त्राचा पाया घातला गेला.
नाणेघाटच्या सुरुवातील एक लेणी कोरली असून, या लेणीत सातवाहन साम्राज्याबद्दल, तसेच हे साम्राज्य लोकोपयोगी कार्य कशा प्रकारे करते, याची माहिती दोन भिंतीवर २० ओळीत कोरून ठेवलेली आहे. दोन हजार वर्षांपूर्वीचा महाराष्ट्र कसा होता, हे जर अनुभवायचे असेल तर नाणेघाटातील हा शिलालेख खूप महत्त्वपूर्ण पुरावा आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक, भौगोलिक, सांस्कृतिक, राजकीय घटनांचा साक्षीदार हा शिलालेख आहे. सन १८३३ मध्ये साइक्स यांनी हा शिलालेख सर्वात प्रथम उजेडात आणला. सन १८८३ मध्ये जॉर्ज बुल्हेर यांनी याचे सर्वात प्रथम वाचन केले.

शिलालेखाची झीज
लेणीत झिरपणाऱ्या पाण्यामुळे या शिलालेखाची बरीच झीज झालेली होती. तेथे असलेले सातवाहन कुळातील आठ पुतळे देखील तुटलेले होते. त्यातील काही प्रतिमेच्या पायांचे अवशेष येथे शिल्लक आहेत. पूर्वी नाणेघाट परिसरात स्थानिकांशिवाय जास्त कोणी जात नव्हते. मात्र, सध्या पावसाळ्याच्या काळात येथे पर्यटक हजारोंच्या संख्येने भेटी देऊ लागले आहेत. इतिहासाबद्दल अनास्था व नाणेघाट शिलालेखाबद्दल जास्त माहीत नसल्याने पर्यटक हे शिलालेखाला हानी पोचवत असल्याचे निदर्शनात आले आहे. मागील काही दिवसांत या शिलालेखातील काही अक्षरे तुटलेली आहेत. जर या शिलालेखाचे व्यवस्थितरीत्या संवर्धन केले नाही, तर येत्या काही वर्षांत हा शिलालेख नष्ट होऊ शकतो.

काय करावे
- पुरातत्त्व विभागाने या शिलालेखाचे शास्त्रीयदृष्ट्या जतन व संवर्धन करणे गरजेचे आहे.
- या शिलालेखाला हात लावू नये, अशी पाटी येथे लावणे गरजेचे आहे.
- पर्यटकांचा शिलालेखाला थेट संपर्क होऊ नये, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
- नागरिकांमध्ये शिलालेखाबद्दल जनजागृती निर्माण करणे गरजेचे आहे.
- भारतीय पुरातत्त्व विभागाच्या वतीने ज्याप्रमाणे नाणेघाटातील दगडी रांजणांचे संवर्धन केले, तसेच या शिलालेखाचे संवर्धन करावे.


प्रिन्सेप याने आपल्या नाण्यांच्या अभ्यासातील अनुभव आणि पुरातन वस्तूंच्या आवडीचा वापर करून शिलालेख व नाण्यांवरील चिन्हांची तुलना केली आणि हळूहळू हरवलेली ब्राह्मी लिपी उलगडली. सन १८३७ मध्ये त्याने हा गूढ अखेर सोडवला. त्यामुळे नाणेघाटामधील शिलालेख देखील वाचन करण्यास मोलाचे सहकार्य लाभले. या शिलालेखाचे जतन केल्यास भविष्यातील पिढीला महाराष्ट्राचा हा इतिहास समजण्यास मदत होईल.
- मकरंद लंकेश्वर, पुरातत्त्व अभ्यासक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com