बिबट्यामुळे ऊसतोड मुलांच्या जिवास धोका

बिबट्यामुळे ऊसतोड मुलांच्या जिवास धोका

Published on

पिंपळवंडी, ता. ४ : चाळीसगाव, भुसावळ, बीडसह विविध ठिकाणांवरून आलेल्या ऊसतोड मजुरांसोबत त्यांची लहान मुलेसुद्धा जुन्नर परिसरात आलेली आहेत. दिवसभर हे मजूर ऊस तोडायचे काम करतात. त्यांची मुलेही तिथेच उसाच्या फडात खेळत असतात. त्यांच्या मुलांच्या डोक्यावर बिबट्याच्या हल्ल्याची टांगती तलवार आहे. सध्या बिबट्यामुळे मुलांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने ऊसतोड मजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

लहान बाळही तिथेच ओढणी, साडीच्या झोक्यात किंवा वरतून उसाच्या पाचटाचे छप्पर करून तेथेच झोपवलेली असतात त्यांच्या कडे लक्ष देण्यासाठी कोणीही नसते. ऊसतोड मजुरांच्या टोळीत लहान मुलांची संख्या शेकडोंनी असून, त्यांच्या जीविताचा प्रश्न आहे. त्याच प्रमाणे ही सर्व मुले शिक्षणापासून देखील वंचित आहेत. त्यांच्या पालकांनी सांगितले की, आम्ही ऊस तोडायच्या कामाला इकडे आल्यानंतर आमच्या मुलांना देखील आम्ही घेऊन येत असतो. कारण आमच्या गावाला या मुलांना सांभाळायला कोणीही नसते. पुढील पाच महिने यांची शाळा बंद असते.


सरकारच्या ऊसतोड कामगारांच्या अनेक योजना या कागदावरच असल्याचे विदारक चित्र यातून दिसत आहे. बिबट्याच्या हल्ल्यात होणारे मानवी मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी काम केलेच पाहिजे परंतु या कष्टकरी लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी लोकप्रतिनिधींनी योग्य ती पावले उचलली पाहिजेत.या ऊसतोड मजुरांना त्यांच्या स्वतःच्या हक्काचे प्रश्न देखील मांडता येत नाहीत.
कारखान्याने, मुकादमांनी या लोकांची सुरक्षित राहण्याची तसेच या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था करणे गरजेचे आहे.

जिवावर उदार होऊन ऊस तोडणीचे काम
इकडे बिबट्याची भीती असून, आम्ही ज्याठिकाणी कोप्या करून राहत असतो तेथे देखील बिबट्या दररोज येत असतो. तसेच उसाच्या फडात नेहमी बिबट्या आम्हाला दिसत असतो. आम्ही जगावे कसे? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. आम्ही जर काम केले नाहीतर मुकादम आम्हाला बोलत असतात. उसाचा ट्रॅक्टर का भरला नाही. बिबट्याची भीती मनात ठेवून जिवावर उदार होऊन आम्हाला आता हे काम करावे लागत आहे.

02671

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com