योग्य वेळी उपचाराअभावी प्रिया चौधरीचा मृत्यू

योग्य वेळी उपचाराअभावी प्रिया चौधरीचा मृत्यू

Published on

प्रियाच्या मृत्यूनंतर प्रश्नांची सरबत्ती
जिल्हा रुग्णालयात आपत्कालीन उपचार का मिळाले नाहीत ?
वायसीएम रुग्णालयातून ससूनमध्ये नेण्याचा निर्णय का घ्यावा लागला ?
पिंपळे गुरव, ता. २ : सरकारी रुग्णालयांत तातडीने योग्य उपचार न मिळाल्यामुळेच देवेंद्र ऊर्फ देवा प्रसाद यांची १६ वर्षीय मुलगी प्रिया हिला जीव गमवावा लागला. औंधमधील जिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर का नव्हते, प्रियाला आपत्कालीन उपचार का मिळाले नाहीत, तेथून महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात तिला नेण्याची वेळ का आली, तेथेही तज्ज्ञ डॉक्टर, आपत्कालीन उपचारांची सोय का नव्हती अशा प्रश्नांची प्रशासनावर सरबत्ती होत आहे.
जिल्हा रुग्णालयातच न्युरोसर्जनचे उपचार मिळाले असते तर देवा प्रसाद यांची थोरली लेक नक्कीच वाचली असती. या संकटानंतर निर्माण झालेले प्रश्न आता देवा प्रसाद यांच्या कुटुंबापुरते मर्यादित राहिले नसून ते संपूर्ण जिल्ह्याचे बनले आहेत.
जिल्हा रुग्णालयात प्रियाची प्राथमिक तपासणी झाली. तिच्या मेंदूची जखम गंभीर होती. न्यूरोसर्जन व मेंदूशी संबंधित उपचारांची सोय उपलब्ध नसल्यामुळे तिला पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात नेण्यात आले. तेथील अवस्थाही वेगळी नव्हती. त्यानंतर तिला पुण्यातील ससून रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेण्यात आला, मात्र त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. अपघातानंतर सुमारे दोन ते तीन तासांचा वेळ गेला. एका रुग्णालयातून दुसरीकडे हलविण्यापूर्वी, हलविले गेल्यानंतर आणि उपचार मिळेपर्यंत रक्तस्राव सुरूच होता. प्रशासकीय हलगर्जीपणा आणि अनास्थेसमोर अखेर प्रियाचे हृदय थांबले.
औंध जिल्हा रुग्णालयाची जिल्ह्यातील सर्वात मोठे शासकीय रुग्णालय आहे. प्रत्यक्षात तेथे न्युरो सर्जन, ट्रॉमा केअर युनिट, तत्काळ शस्त्रक्रिया पथक, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे नाहीत. त्यामुळे अत्यवस्थ रुग्णाला दुसरीकडे पाठवावे लागते. प्रियाचा बळी घेतल्यानंतर तरी प्रशासनाला जाग येणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियाला जिल्हा रुग्णालयातून वायसीएम रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तेथे आयसीयू बेड उपलब्ध नसल्याने पुढील उपचारांसाठी ससून रुग्णालयात नेण्याचे ठरले.


हिंजवडी अपघातातील गंभीर जखमी मुलीच्या मृत्यूबाबत सविस्तर माहिती घेऊन आवश्यक ती कारवाई करण्यात येईल.
- प्रकाश आबिटकर, आरोग्य मंत्री, महाराष्ट्र

हलगर्जीपणा झाला असेल तर नक्कीच चौकशी केली जाईल. संबंधित विभागाकडून संपूर्ण तपास करण्यात येईल आणि दोषी आढळल्यास आरोग्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल करून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल.
- शंकर जगताप, आमदार

जिल्हा रुग्णालय हे ‘लेव्हल २ हॉस्पिटल’ असल्यामुळे तेथे न्युरोसर्जनची नियुक्ती नसते. अशा उपचारांसाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची गरज असते. त्यासाठीचा प्रस्तावही शासनाकडे पाठविण्यात आला आहे. संबंधित रुग्णाच्या डोक्याला गंभीर जखम असल्याने त्वरित न्युरो सर्जनची आवश्यकता होती. त्यामुळे रुग्णाला पुढील उपचारांसाठी दुसरीकडे ‘रेफर’ करण्यात आले.
- नागनाथ यमपल्ले, शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, नवी सांगवी

आयसीयू बेड उपलब्ध नसल्यास उपचार घेत असलेल्या रुग्णाला बाहेर काढणे शक्य नसते. त्यामुळे अशा परिस्थितीत ससून रुग्णालयात पाठविणे हा एकमेव पर्याय उरतो.
- डॉ. राजेश वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम रुग्णालय

हिंजवडीतील अपघातानंतर जखमींना प्रथम औंध जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. त्यानंतर ससून जनरल हॉस्पिटलचा संदर्भ दिला. रुग्णालयात न्यूरोसर्जन नसल्याने अपघातग्रस्ताचा मृत्यू झाला. राज्यातील आरोग्य व्यवस्था मरणपंथाला आली असून तज्ज्ञ डॉक्टरांच्या अभावामुळे राज्य शासन सक्षम आरोग्य सेवा देण्यास असमर्थ आहे, असे यावरून स्पष्ट दिसते.
- शरत शेट्टी, उपाध्यक्ष, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघ
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com