शौर्य, कलात्मकता, धार्मिक, उत्सवप्रिय पुरंदर
सुनील मेमाणे (पारगाव मेमाणे, ता. पुरंदर)
पुरंदरची भूमी छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्माचे स्वागत करणारी, अनेक ऐतिहासिक लढाया लढणारे सरदार, स्वातंत्र्यसेनानी, थोर साहित्यिक, कलाकारांना पोसणारी, पवित्र संतांच्या सहवासात पावन झाली आहे. लाखो भाविकांना मार्गदर्शन देऊन जीवन सुखकर करणारी नारायणपूर येथील दत्तभूमी, वैराग्य शिकवणारी कानिफनाथ गडाची भूमी, उगमापासून संगमापर्यंतच्या तीरावर अनेक पुरातन शिवमंदिरांना अभिषेक घालणारी कऱ्हा नदी आपापल्या ग्रामदैवतांच्या वार्षिक यात्रांच्यायोगाने पारंपरिक ढोल-लेझीम छबिने, कावडी,सांप्रदायिक भजने, एकनाथी भारुडांच्या माध्यमातून शौर्य, कलात्मकता, धार्मिकपणा, भाविकता, उत्सवप्रियता जपणाऱ्या पुरंदरबद्दल थोडेसे....
यात्रांचे गाव, जेजुरी
जेजुरीचा खंडोबा, महाराष्ट्राचे कुलदैवत. जयाद्री पर्वताच्या डोंगररांगांमध्ये भगवान शंकराचे वरदान मिळवून ऋषीमुनी, सामान्य जनतेला छळणाऱ्या ‘मणी व मल्ल’ या उन्मत्त दैत्यांचा भगवान शंकराने ‘मार्तंड भैरवा’चा अवतार घेऊन संहार केला. म्हणून ‘मल्हारी मार्तंड’ या नावानेही ओळखले जातात. समस्त महाराष्ट्राचे कुलदैवत असल्याने कुळधर्म , कुळाचार मोठ्या प्रमाणात होतो. भाविक भंडार-खोबरे उधळून, दर्शन, तळी भरून, जागरण, गोंधळ असे विधी करण्यासाठी जेजुरी गडावर येतात. श्रीक्षेत्र जेजुरीत खंडोबाच्या अनेक यात्रा भरतात. यात्रांचे गाव म्हणून जेजुरी प्रसिद्ध आहे. सोमवारी अमावस्या आली की ‘सोमवती यात्रा’ भरते. वर्षातून दोन वेळा हा योग येतो. सोमवतीला स्नानाची पर्वणी साधण्यासाठी व खंडोबाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातून भाविक येतात. माघ, पौष व चैत्र या तीन पौर्णिमांना यात्रा भरते. कोळी बांधव घरातील व गावाचे देव खंडोबाच्या भेटीसाठी आणतात. शिखराला काठी टेकविण्याचा मानाचा कार्यक्रमही या यात्रेत असतो. संगमनेरचे होलम, सुप्याचे खैरे व जेजुरीचे होळकर यांच्यासह सुमारे १०० पेक्षा अधिक काठ्या या स्पर्धेत सहभागी होतात. पौष पौर्णिमेला गाढवांचा बाजार भरतो. खंडोबाच्या दर्शनालाही भाविक गावच्या काठ्या घेऊन येतात. चैत्र पौर्णिमेस मार्तंड भैरवाचा अवतार दिवस म्हणून या दिवशी यात्रा भरते. आषाढ शुद्ध प्रतिपदेला गणपूजा यात्रा असते. स्वयंभू लिंगावर भंडाऱ्याची शेज उभारली जाते. कलावंत रात्रभर हजेरी लावतात.
संत सोपानकाका समाधी सोहळा
बालवयात मातृ पितृ छत्र हरपलेल्या संत सोपानदेवांना वडीलबंधू निवृत्तीनाथ व ज्ञानेश्वर यांच्या वात्सल्यात अध्यात्म बोध मिळाला. बालपणापासून भटकंती वाट्याला आली. पुरंदरमधील कऱ्हानदी काठावरील सासवड हे ठिकाण संजीवन समाधीसाठी सोपानदेवांनी निवडले.मार्गशीर्ष वद्यअष्टमी ते मार्गशीर्ष वद्य चतुर्दशी या काळात आध्यात्मिक पर्व सोहळा येथे साजरा होतो. विविध धार्मिक कार्यक्रम होतात. वद्य त्रयोदशीला प्रत्यक्ष संजीवन समाधी दिनी समाधी वर्णनाचे व नंतर काल्याचे कीर्तन होते. समाधीवर पुष्पवृष्टी होते. गोसावी कुटुंबाकडे कीर्तनाची प्रथा होती. सध्या संत नामदेवांचे वंशज केशव महाराज नामदास ही परंपरा चालवत आहेत. राज्यभरातून वारकरी संप्रदायाचे भाविक सोहळ्यासाठी उपस्थित असतात.
भुलेश्वर
भाविकांसाठी श्रद्धेचे व पर्यटकांसाठी पर्यटनाचे ठिकाण म्हणून पुरंदरमधील भुलेश्वर मंदिर एक आदर्श उदाहरण आहे. येथील प्राचीन शिवमंदिर यादवकालीन आहे. मंदिरातील अंतर्भाग व बाह्यभागावर असंख्य व अप्रतिम शिल्पे पाषाणात कोरलेली आहेत. हे मंदिर हेमाडपंथी शैलीचे उभारले असून भाविकांना व पर्यटकांना नेहमीच आकर्षित करते. त्यामुळे वर्षभर येथे रांगा पहावयास मिळतात. स्थानिक, पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे ते आराध्य दैवत आहे. श्रावण महिन्यात ‘धार’ घालण्यासाठी सर्व शिखर कावडींचे येथे आगमन होते. महाशिवरात्रीला येथे मोठा उत्सव साजरा होतो. त्यास जिल्ह्यातून लोक हजेरी लावतात. या जागृत देवस्थानाचे श्रद्धापूर्वक दर्शन घ्यायला व हेमाडपंथी वास्तुकलेची अप्रतिम शिल्पकृती अनुभवायला हरकत नाही.
पंचक्रोशी संत तेल्या भुत्याची प्रथम मानाची कावड
दक्षिण भारताचे कैलास म्हणून ओळखले जाणारे शिखर शिंगणापूर येथे पुरंदरच्या पूर्व भागातील संत तेल्या भुत्याची पंचक्रोशी कावड प्रथम मानाची मानली जाते. हा पवित्र, ऐतिहासिक वारसा यात्रा रूपाने खळद, कुंभारवळण एखतपूर, मुंजवडी, खानवडी मोठ्या उत्साहाने साजरा करते.पाचही गावांना कावडीच्या पूजेचा फिरता मान असतो. आख्यायिका अशी की, एखतपूर येथील निस्सीम शिवभक्त संत तेली भूतोजी कऱ्हा नदीच्या पवित्र जलाची कावड घेऊन हरहर महादेव असे शिव नाम जपत बिगरदोर अवघड मुंगी घाटाने शिखर शिंगणापूर येथील शंभु महादेवाला धार घालत.जाताना राहत्या घराला लावलेली आग आल्यावर विझलेली असे घर, तेलघाणा पूर्ववत होत असे. संत भूतोजींनी महत्प्रयासाने सुरू केलेली परंपरा पंचक्रोशी ग्रामस्थांनी गुलालाची उधळण, पारंपारिक नृत्य व वाद्यांच्या गजरात यात्रा स्वरूपात अत्यंत भक्तिभावाने जपली आहे.
वीरचे श्रीनाथ म्हस्कोबा
भक्त कमळाजीच्या भक्तीमुळे मूळ सोनरी, उस्मानाबाद तालुका भूम परांडा येथून भगवान शंकर, काळभैरवाचा अवतार असलेले श्रीनाथ म्हस्कोबा वीर येथे आले. जीवनातील सांसारिक अडचणी सोडविणारा व ‘बरकत’ देणारा देव यासाठी ‘सवाई सर्ज्याचं चांगभलं’ असा जयघोष करत विजापूर, नंदूरबार, बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश, गुजरात, उस्मानाबाद, कर्नाटक अशा महाराष्ट्रेतर राज्यांच्या कानाकोपऱ्यातून भाविक येतात. गुलालाची मुक्त उधळण करतात.माघ पौर्णिमेला येथील वार्षिक यात्रा भरते. पंचमीपासून कमळाजींचे वंशज भाकणूक सांगतात. देवांचे लग्न व ''मारामारी'' या नावाने प्रसिद्ध असलेला देवाचा प्रकटदिन यात्रेचा महत्त्वाचा दिवस समजतात. सातारच्या छत्रपतींनी श्रीनाथ म्हस्कोबा कुलदैवत असल्याचे जाहीर केले आहे.
वाल्हे, सात रांजण
भारताच्या प्रमाणग्रंथांपैकी रामायण हा ग्रंथ लिहिणाऱ्या वाल्या कोळ्याचे तथा वाल्मीक ऋषींचे वास्तव्य असणारे प्राचीन वाल्हे येथे ‘वाल्या कोळ्याचे सात रांजण’ हे प्रसिद्ध ठिकाण आहे. आख्यायिका : द्वापर युगातील कर्णाप्रमाणेच त्रेता युगातील वाल्मिकांचा जन्म हिरण्यगर्भापासून झाल्याची आख्यायिका आहे . जलप्रवाहात वाहत जाणाऱ्या बाळाचा सांभाळ एका कोळ्याने केला व त्यास वाल्मीकी हे नाव प्राप्त झाले. नारदांच्या बोधामुळे राम नामाचा जप केल्याने हा लूटमार व संहार करून खड्यांनी सात रांजण भरणारा वाल्या, वाल्मीक ऋषी झाला व त्याने लिहिलेल्या रामायणाप्रमाणे रामावतारात देव वागल्याचे संत साहित्यात संदर्भ मिळतात. वाल्मीक ऋषींच्या वास्तव्याने गावांना वाल्हे व कोळविहिरे अशी नावे आहेत. जेजुरी पासून पूर्वेला काही मिनिटे प्रवासाच्या अंतरावर हे ठिकाण डोंगरावर आढळते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

