कविता आणि विनोदी किश्‍श्‍यांची रंगली मैफल बारामती साहित्य कट्टा ः नक्षत्रांच्या वनात कधी हासू तर तर कधी आसूंचा रंगला खेळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कविता आणि विनोदी किश्‍श्‍यांची रंगली मैफल
बारामती साहित्य कट्टा ः नक्षत्रांच्या वनात कधी हासू तर तर कधी आसूंचा रंगला खेळ
कविता आणि विनोदी किश्‍श्‍यांची रंगली मैफल बारामती साहित्य कट्टा ः नक्षत्रांच्या वनात कधी हासू तर तर कधी आसूंचा रंगला खेळ

कविता आणि विनोदी किश्‍श्‍यांची रंगली मैफल बारामती साहित्य कट्टा ः नक्षत्रांच्या वनात कधी हासू तर तर कधी आसूंचा रंगला खेळ

sakal_logo
By

मोरगाव, ता. ६ ः शेती- मातीच्या कविता, गंमतीदार प्रश्‍नांनी घेतलेली फिरकी, चटकदार वाक्यांची फोडणी, विनोदी किस्स्यांची रंगलेली मैफलीमुळे बारामती साहित्य कट्ट्यांवरील सायंकाळ अविस्मरणीय ठरली.
कऱ्हावागज (ता. बारामती) येथील नक्षत्रांच्या वनात दै. ‘सकाळ’चे उपसंपादक व विनोदी लेखक सु. ल. खुटवड व पाठ्यपुस्तकातील कवी हनुमंत चांदगुडे
यांच्या मैफलीचे आयोजन केले होते. मावळतीला जाणारा सूर्य आणि पक्ष्यांच्या किलबिलाटाची साथ यामुळे कार्यक्रम रंगतदार झाला.
‘बाप रगात होऊन, रोज पाटातून व्हातो, मग कणसाचा जन्म ताटातून होतो’ या चांदगुडे यांच्या वडिलांवरील कवितांनी रसिकांच्या हृदयाचा ठाव घेतला.
तर खुटवड यांनी इंग्लंडचे प्रिन्स चार्ल्स यांची राजस्थानमध्ये जाऊन मुलाखत घेतली होती. त्यावेळी झालेल्या गमती- जमती, इंग्रजी शब्दांवरून झालेला घोळ हे खुटवड यांनी आपल्या खुमासदार शैलीत मांडले.
‘माझ्या माईच्या संसारी, गाडग्या मडक्याची शोभा, छप्पराच्या वळचणीला काळ टपूनिया उभा’ या आईवरील कवितांच्या ओळी ऐकून रसिकांना भरून आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवलेल्यानंतर कोणकोणत्या संकटांना सामोरे जावे लागते, आपली कविता सादर करून झाल्यानंतर कवींचे वागणे कसे असते, संयोजक कसे बेरकी असतात, हे सोदाहरणासह खुटवड यांनी सांगितल्यानंतर हशा आणि टाळ्यांचा प्रतिसाद मिळाला.
‘रानभैरी शब्द माझे काकरीत आलो, रांधले आयुष्य तेव्हा भाकरीत आलो,’ ही शेती आणि साहित्यावरील कवितेला रसिकांची मोठी दाद मिळाली. प्रसिद्ध निवेदक शशांक मोहिते यांनी मुलाखतीत रंग भरले. अरविंद तावरे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सुजित अडसूळ यांनी आभार मानले.

चौकट
दहा हजार वाचकांचे दूरध्वनी
‘सकाळ’मधील ‘पंच’नामा सदरासंदर्भात सूत्रसंचालकांसह प्रेक्षकांनी विविध प्रश्‍न खुटवड यांना विचारले. आतापर्यंत दहा हजार चारशे वाचकांनी फोन करून, या प्रतिक्रिया दिल्या असल्याचे खुटवड यांनी सांगितले. यासंदर्भात अनेक हृदयस्पर्शी अनुभवही त्यांनी सांगितले.
फोटो ः २३०१८