
परीक्षांचा हंगाम, विद्यार्थी अभ्यासात गुंग
पिंपरी, ता.१० ः सध्या परीक्षांचा हंगाम सुरू आहे. राज्य व केंद्रीय मंडळांच्या बारावीच्या परीक्षांनी सुरू झालेला हंगाम मे अखेरपर्यंत सुरू असणार आहे. यात विविध बोर्ड परीक्षा, शालेय परीक्षा आणि त्यानंतर होणाऱ्या विविध शाखांच्या प्रवेशपूर्व परीक्षांचा समावेश आहे. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांची ‘टेस्ट’ सुरू आहे. बारावी परीक्षा अंतिम टप्प्याकडे आहे, तर दहावीचे निम्मे पेपर झाले आहेत. माध्यमिक विभागाची परीक्षा महिना अखेरपासून सुरू होत आहे.
जानेवारी महिन्यापर्यंत शाळांमधील स्नेहसंमेलने व इतर कार्यक्रम आटोपले असून आता परीक्षांचे दिवस आले आहेत. या हंगामाला २१ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे हा हंगाम बोर्डाच्या परीक्षे नंतर होणाऱ्या विविध शाखांमध्ये प्रवेशासाठी असलेल्या प्रवेशपूर्व परीक्षांपर्यंत, म्हणजे मे महिन्यापर्यंत सुरू राहणार आहे. राज्यात २१ फेब्रुवारीपासून सुरू झालेली बारावीची परीक्षा अंतिमकडे आहे. तर तीन मार्चपासून सुरु झालेली दहावीची २६ मार्चपर्यंत असेल. राज्य बोर्डाप्रमाणे सीबीएसई, आयसीएसईच्या दहावी व बारावीच्याही सुरू आहेत. महापालिका माध्यमिक विभागाचे इयत्ता आठवी ते नववीची २८ मार्चपासून सुरू होईल. तर प्राथमिक विभागाची पहिली ते सातवीची एप्रिलनंतर होईल. शाळांमध्ये वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक तयार करण्याचे काम सुरू आहे. सध्या सगळीकडे परीक्षांचा वातावरण असल्याने रात्री उशिरापर्यंत जागरण, घोकंपट्टी ते अगदी देवळांना दररोज भेटी अशी विविध मार्गांनी यशासाठी प्रयत्न सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान, आयसीएसईच्या बारावीच्या परीक्षा ९ फेब्रुवारीपासून, तर सीबीएसईच्या बोर्डाची दहावीची २० फेब्रुवारीला, तर बारावीची २४ फेब्रुवारीपासून सुरु झाली आहे. या परीक्षा मार्चअखेरीस संपतील. याच कालावधीत शाळांमधील परीक्षा होत असल्याने पुढचे दोन महिने पूर्णपणे परीक्षांचे वातावरण असणार आहे.
-काहीजण परीक्षा चक्रातच
बारावीच्या परीक्षा संपल्यानंतरही काही विद्यार्थ्यांची या परीक्षा चक्रातून सुटका होणार नाही. कारण अभियांत्रिकी व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या अनेक प्रवेशपूर्व परीक्षा एप्रिलपासून सुरू होणार आहेत. यात जेईई (मेन) ऑनलाइन, जेईई (मेन) ऑफलाइन, एआयपीएमटी, एमएच सीईटी, जेईई (अॅडव्हान्स) या परीक्षा होणार असून मे अखेरपर्यंत या घेण्यात येणार आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांची दमछाक होत आहे.